Dedication and Bhumi Pujan of National Highways at Solapur by Nitin Gadkari
सोलापुरात राष्ट्रीय महामार्गांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन
केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोलापुरात ८ हजार १८१ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं. गडकरी यांच्या हस्ते सोलापूर- विजयपूर, सोलापूर- सांगली आणि सोलापूर अक्कलकोट असे 3 राष्ट्रीय महामार्ग यावेळी राष्ट्राला समर्पित करण्यात आले. अंदाजे ८ हजार १७ कोटी रुपये खर्चातून अडीचशे किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार केले आहेत. तर १६४ कोटी रुपयांच्या ४२ किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन देखील गडकरी यांच्या हस्ते झालं.
सुरत-चेन्नई ग्रीन एक्स्प्रेस महामार्गाचे काम सुरु असून यामुळे सुरतहून मुंबई-पुण्यमार्गे होणारी वाहतूक नाशिक-नगर-सोलापूर मार्गे थेट येईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच वेळ वाचेल. मुंबई-पुणे-बंगलोर मार्गाचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे ते म्हणाले.
या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 17 हजार 200 कोटी रुपये दिल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जास्तीत जास्त इथेनॉल तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रीन हायड्रोजन हे आपलं भविष्य असून यात अधिक संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोलापूर जिल्हा व परिसराला देशाच्या मुख्य प्रवाहातआणण्याची क्षमता असलेले हे रस्ते प्रकल्प सोलापूरकरांचे जीवन सुखी-समृद्ध व विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊनअपघातांचे प्रमाण व पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागांना शहराशी जोडणे सुलभ होईल.
सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट, पंढरपूर यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प शहरातील व जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोच सुलभ करतील. शेती मालाची वाहतूकही सुरळीत होण्यास या रस्त्यांमुळे मदत होईल.
या कार्यक्रमाला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर गडकरी यांनी सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची पाहणी केली, तसंच या बसमधून प्रवास केला आणि बस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली.
हडपसर न्युज ब्युरो.