Defence ministry signs agreement with HAL to procure 70 HTT-40 Basic Trainer Aircraft, 3 Cadet Training Ships
संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत 70 HTT-40 बेसिक ट्रेनर विमाने, 3 कॅडेट प्रशिक्षण जहाजे खरेदी करण्यासाठी केला करार
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून 70 एचटीटी-40 बेसिक प्रशिक्षण विमाने आणि आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी)कडून तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजे खरेदी करण्याच्या करारावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली :: संरक्षण मंत्रालयाने आज (7 मार्च 2023) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) या दोन कंपन्याशी अनुक्रमे 70 एचटीटी-40 बेसिक प्रशिक्षण (मूलभूत प्रशिक्षण) विमाने आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांच्या खरेदीसाठी करार केला.
नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या तसेच करारांची देवाणघेवाण झाली. यावेळी संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी तसेच एचएएल आणि एल अँड टी चे प्रतिनिधी उपस्थित होते.
अलीकडेच सरकारने HAL कडून 70 HTT-40 ट्रेनर विमानांच्या खरेदीला सहा हजार 800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची मान्यता दिली आहे. सरकारने तीन हजार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांच्या संपादनासाठी एल अँड टी सोबत करार केला होता. एचटीटी-40 ट्रेनर एअरक्राफ्ट भारतीय वायुसेनेच्या पायाभूत ट्रेनर विमानांची कमतरता भरून काढेल.
सहा वर्षांच्या कालावधीत या विमानाचा पुरवठा केला जाईल. कॅडेट प्रशिक्षण जहाजे नौदल अधिकारी कॅडेट्सच्या प्रशिक्षणाची पूर्तता करतील. चेन्नईच्या कट्टुपल्ली येथील एल अँड टी शिपयार्डमध्ये ही जहाजे स्वदेशी डिझाइन, विकसित आणि बांधली जातील. या प्रकल्पामुळे साडेचार वर्षांच्या कालावधीत 22.5 लाख मनुष्यदिवसांचा रोजगार निर्माण होणार आहे.
एचटीटी-40 प्रशिक्षण विमान
कमी वेग उत्तम रीतीने हाताळू शकण्यासाठी एचटीटी-40 या टर्बो प्रॉप विमानात विशेष सोय असून हे विमान प्रशिक्षण देताना उत्तम परिणामकारकता साधते. या पूर्णपणे एरोबॅटिक टँडम सीट टर्बो ट्रेनर विमानामध्ये वातानुकूलित कॉकपिट, आधुनिक एव्हीओनिक्स, हॉट री-फ्युएलिंग, रनिंग चेंज ओव्हर आणि झिरो-झिरो इजेक्शन सीट आहेत.
नव्याने समाविष्ट झालेल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी भारतीय हवाई दलात असलेली मूलभूत प्रशिक्षण विमानांची कमतरता हे विमान भरून काढते. खरेदीमध्ये सिम्युलेटरसह संबंधित उपकरणे आणि प्रशिक्षण सहायक सामग्रीचा समावेश असेल. हे विमान देशी बनावटीचे असल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ते अद्ययावत करता येण्याजोगे आहे. सहा वर्षांच्या कालावधीत या विमानांचा पुरवठा केला जाईल.
एचटीटी-40 मध्ये अंदाजे 56% स्वदेशी सामग्री वापरली आहे. मुख्य घटक आणि उपप्रणालींच्या स्वदेशीकरणाद्वारे उत्तरोत्तर हे प्रमाण 60% पर्यंत वाढेल. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासह (एमएसएमई) देशांतर्गत खाजगी उद्योगांना, एचएएल त्यांच्या पुरवठा साखळीत सहभागी करून घेईल. खरेदी प्रक्रियेत 100 पेक्षा जास्त एमएसएमईमध्ये समाविष्ट हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे.
कॅडेट प्रशिक्षण जहाजे
भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी ही जहाजे महिलांसह अधिकारी कॅडेट्सना त्यांच्या मूलभूत प्रशिक्षणानंतर समुद्रात प्रशिक्षण देतील. राजनैतिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने हे जहाज मित्र देशांतील कॅडेट्सना प्रशिक्षणही देईल. संकटग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी, शोध आणि बचावकार्य तसेच मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) मोहिमांसाठीदेखील ही जहाजे तैनात केली जाऊ शकतात. ही जहाजे 2026 पासून उपलब्ध व्हायला सुरुवात होणार आहे.
चेन्नईच्या कट्टुपल्ली येथील एल अँड टी शिपयार्डमध्ये जहाजे विकसित आणि उत्पादित केली जातील. या प्रकल्पामुळे साडेचार वर्षांच्या कालावधीत 22.5 लाख मनुष्यदिवसांचा रोजगार निर्माण होणार आहे. यामुळे एमएसएमईसह भारतीय जहाजबांधणी आणि संबंधित उद्योगांमध्ये सक्रिय सहभागास प्रोत्साहन मिळेल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com