Dental treatment will also be available in rural hospitals – Public Health Minister Rajesh Tope
ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे
दंत क्षेत्रास ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार : वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई : बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दंत चिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व धोरण आखण्यासाठी दंत परिषदेने अभ्यासगटाद्वारे शिफारसी शासनास सादर कराव्यात. धोरणात्मक बदल झाल्यास या क्षेत्रास उर्जितावस्था प्राप्त होईल, असे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्य दंत परिषदेने कोविड दंत योद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंत्री राजेश टोपे तर पुरस्काराचे वितरण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, निबंधक शिल्पा परब, डॉ. जगन्नाथ हेगडे, डॉ. अशोक ढोबळे यांच्यासह परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मंत्री राजेश टोपे आणि मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे रूग्णांना माहिती व सेवा मिळावी यासाठी मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
नायर रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ निलम अंधराळे, सेठ नंदलाल धूत रूग्णालयाचे दंत चिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ हिमांशु गुप्ता यांच्यासह अन्य दंतचिकित्सकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
हडपसर न्युज ब्युरो