Dhananjay Munde’s condition is stable – Deputy Chief Minister Ajit Pawar
धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली. डॉक्टरांनी त्यांना येत्या तीन – चार दिवसात आराम मिळेल, अशी माहिती दिल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. श्री. पवार यांनी धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत विश्रांतीचा सल्ला दिला.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ.आंबेडकर जयंती आम्ही यशस्वी करु – उपमुख्यमंत्री
रुग्णालयातील चर्चे दरम्यान उद्या दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने केली आहे. याबद्दल चर्चा करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘धनंजय तू आधी बरा हो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून यशस्वी करू;’ असा स्नेहाचा सल्लाही धनंजय मुंडे यांना दिला.
Hadapsar News Bureau.