Diabetes Free Maharashtra project in the state with the help of Denmark
डेन्मार्कच्या मदतीने राज्यात ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची डेन्मार्कच्या राजदूतांशी चर्चा
मुंबई : डेन्मार्कच्या मदतीने राज्यात पुढील वर्षी ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वान यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा केली.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज श्री. स्वान यांच्याशी विविध प्रकारच्या सहकार्य कराराबाबतही प्राथमिक चर्चा केली. यावेळी डेन्मार्कचे व्यापार आणि उद्योगमंत्री सोरेन कैनिक, उपमंत्री हेन्री करकेडा, आनंद त्रिपाठी, रुरल डिजिटल हेल्थ अँड फायनान्सचे डॉ. रतिश तागडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत भारत-डेन्मार्क यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रात औषधे, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा विकास आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या तिन्ही क्षेत्रामधे गुंतवणूक करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य व डेन्मार्क यांच्यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यात उच्चस्तरीय बैठक होणार असून दोघांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने सामंजस्य करार करण्याचा दृष्टीने पाऊले उचलली जाणार आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com