Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar directed to prepare type plan for all theaters in the state
राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण करताना राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन (नमुना नकाशा) तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाट्यनिर्माते दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सर्व नाट्यगृहांसाठी ‘टाईप प्लॅन’ तयार करताना आसन क्षमतेप्रमाणे नियोजन करण्यात यावे. साधारणपणे 400, 600, 800 आणि 900 आसन क्षमतेसाठी आवश्यकता असणाऱ्या बाबी अभ्यासण्यात याव्यात. साधारणपणे प्रत्येक नाट्यगृहांसाठी 4 कोटी ते 10 कोटी रुपयांची आवशकता असून हा निधी कसा देता येईल याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्यात यावा. तसेच निधी वितरणाचे टप्पेही ठरवून घेण्यात यावेत.
राज्यात सध्या एकूण 83 नाट्यगृहे आहेत. यापैकी खाजगी 28 नाट्यगृहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित 51 आणि राज्य शासनाची 4 नाट्यगृहे आहेत. या सर्व नाट्यगृहांचे पुढील 10 वर्षांतील तंत्रज्ञानाचे बदल करताना आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या नाट्यगृहाचे नाविन्यपूर्ण नियोजन करुन काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com