Disaster Management Training Camp for Home Guard in the District
जिल्ह्यातील गृहरक्षक दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
पुणे : जिल्ह्यातील गृहरक्षक दलाला (होमगार्ड) आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित शिबिराचे उद्घाटन होमगार्ड जिल्हा समोदशक तथा पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, उपनियंत्रक नागरी संरक्षण नितीन आवारे उपस्थित होते. गृहरक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून २० मेपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध पैलूचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबिरात २०० होमगार्ड सहभागी झाले आहेत.
यावेळी श्री. घट्टे यांनी होमगार्डना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे आयोजनामागील हेतू तसेच प्रशिक्षणाचे महत्व सांगितले. होमगार्डनी त्यांच्या तालुक्यातील प्रत्येकी १० होमगार्डना त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबाबतची माहिती देऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त होमगार्डपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती पोहोचविण्याच्या आणि त्यांना प्रशिक्षित करण्याच्या सुचना श्री.घट्टे यांनी दिल्या.
नैसर्गिक आपत्ती किंवा कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त, पालखी बंदोबस्त अशा वेळी अशा प्रशिक्षित होमगार्डच्या प्रशिक्षणाचा योग्य वापर केल्यास प्रशिक्षणाचा उद्देश फलद्रूप होईल, असेही ते म्हणाले.
आजच्या होमगार्डमधून चांगल्या प्रशिक्षित ५० पुरुष व महिला होमगार्डचे एक पथक तयार करुन त्यांची यादी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात असणार आहे. आवश्यकता पडेल त्यावेळी त्यांचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनासाठी केला जाईल, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. बनोटे यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनटक्के व त्यांच्या पथकाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण साहित्याची माहिती दिली.
हडपसर न्युज ब्युरो