Rajya Sabha takes up discussion on Jammu and Kashmir Appropriation Bill, 2022
जम्मू -काश्मीर विनियोग विधेयक आणि जम्मू-काश्मीर विनियोग विधेयक क्रमांक दोन वर राज्यसभेत चर्चेला सुरुवात
नवी दिल्ली : राज्यसभेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक आणि जम्मू-काश्मीर विनियोग विधेयक क्रमांक २ विचारार्थ मांडलं.
काँग्रेसचे विवेक तनखा यांनी या विधेयकावरची चर्चा सुरु केली. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट किंवा राष्ट्रपती राजवट आहे, मात्र जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी तिथे विधानसभा नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण नसल्यानं तिथे गुंतवणूक येत नसल्याचं ते म्हणाले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व्ही शिवदासन, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, काँग्रेसच्या रजनी पाटील, जदयूचे रामनाथ ठाकूर, अण्णाद्रमुकचे एम थंबीदुराई यांनीही या चर्चेत भाग घेतला.
त्याआधी आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु झालं तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी जागतिक जल दिनानिमीत्त जलसंवर्धाच्या आवश्यकता सभागृहासमोर मांडली. चीनमधल्या विमान अपघात आणि त्याबद्ल भारतानं व्यक्त केलेल्या सहवेदना विषयही त्यांनी उपस्थित केला. यानंतर या अपघातात मरण पावलेल्यांचा आदरार्थ सभागृहात मौनही पाळलं गेलं.
इंधनदरवाढीच्या मुद्यावर चर्चा घेण्याबद्दल विरोधी सदस्यांकडून नोटीसा आल्याचं त्यांनी सांगितलं मात्र यावरच्या चर्चेची मागणी नायडू यांनी फेटाळून लावली. त्यावर विरोधकांनी हौद्यात उतरून गोंधळ सुरु केल्यानं सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. दुपारी २ वाजता कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर सभागृहाचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक आणि जम्मू-काश्मीर विनियोग विधेयक क्रमांक २ वर चर्चा पुढे सुरु ठेवायचं आवाहन केलं.