Distribution of Zilla Parishad Best Teacher and President Cup Award
जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण
शिक्षकांनी शिक्षणदानाचे काम व्यवसाय म्हणून न करता ध्येय म्हणून करावे
-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : शिक्षकांनी स्वीकारलेले काम व्यावसायिक भावनेतून न करता एक उदात्त ध्येय म्हणून सेवाभावनेने करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण प्रसंगी मंत्री ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, ब्रिटिशांनी त्यांना सोयीस्कर पद्धतीने शिक्षणपद्धतीची रचना केली होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा मूळ गाभा पुन्हा एकदा देशातल्या नागरिकांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न आहे. लहान वयात झालेले संस्कार घेऊनच मुले पुढे जात असतात. पूर्वी गुरुकुलमध्ये विद्यार्थी अनेक विषयात पारंगत होत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार राबवण्यात येणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे आजचे आपले विद्यार्थीदेखील अनेक विषयात पारंगत होतील
नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणातील टप्पे बदलण्यात येणार आहेत. शासन शिक्षणावर मोठा खर्च करते. ही बाब लक्षात घेऊन शिक्षकांनी मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासह संस्कारीत होतील यासाठी परिश्रम घ्यावेत.
वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी स्वतःला वेळेत बांधून न घेता अधिक वेळ काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन सर्व ते सहकार्य करेल. हा निधी शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह, क्रीडा विषयक सुविधा, ई-लर्निंग, शाळेसाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी वापरण्यात यावा, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
यावेळी मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुख यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com