Domestic workers are an integral part of our family – Mrs Mrinal Kulkarni.
घरेलू कामगार ह्या आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक – सौ. मृणाल कुलकर्णी.
कोरोना काळातील घरेलू कामगारांचे कार्य वंदनीय – आ. सिद्धार्थ शिरोळे.
पावसाळ्यात घरेलू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम स्पृहणीय – मा. मुरलीधर मोहोळ
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सारथी ग्रुपच्या वतीने घरेलू कामगार महिलांना छत्री व रेनकोट वाटप
पुणे : घरेलू कामगार महिला ह्या आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक असून त्या एक दिवस जरी आल्या नाहीत तरी आपण अस्वस्थ होतो. हे केवळ घरकाम करावे लागेल म्हणून नाही तर या भगिनींशी सगळ्या कुटुंबाचे एक नाते निर्माण झालेले असते म्हणून प्रत्येक कुटुंबात त्यांचे एक वेगळे महत्व आहे असे गौरवोदगार प्रसिद्ध सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी काढले.
विशेषतः कोरोनाच्या संकटकाळात हे नाते अधिक दृढ झाल्याचे नमूद करून ह्या महिलांप्रती आपण अधिक संवेदनशील असायला हवे असेही मृणालताई म्हणाल्या.भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षातील कार्यकर्त्यांकडून एक महिना हा सेवा कार्याला समर्पित करण्यात आला आहे.त्याला अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सारथी ग्रुप च्या वतीने घरेलू कामगार महिलांना छत्री व रेनकोट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.
ह्या महिलांना छत्री व रेनकोट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जात आहे असे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले.कोरोना काळात घरेलू कामगारांनी जीव धोक्यात घालून केलेले कार्य वंदनीय असून त्यांच्यामुळे अनेक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांग यांचा हा काळ सुखावह झाला असेही ते म्हणाले. घरेलू कामगारांमुळे घराघरात सामाजिक समरसता चा आदर्श दिसून येतो असेही आ.सिद्धार्थ शिरोळे म्हणाले.
पावसाळ्यात घरेलू कामगार महिला स्वतःचा विचार न करता अनेकदा भिजत कामावर जातात, यातून त्या आजारी ही पडतात मात्र त्या दुखणे अंगावर काढतात, अश्या परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
ह्या भगिनी व रोज सकाळी आपल्याला वृत्तपत्र, दूध पोहोचवीणारे व रिक्षाचालक भिजू नयेत म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर खर्च टाळून घरेलू कामगार, दूधवाले, रिक्षाचालक, वृत्तपत्र विक्रेते यांना छत्री व रेनकोट वाटप करा असे जे आवाहन केले. ते एखादा सुसंस्कृत नेताच करू शकतो आणि त्याचे पालन करून ही मदत करणे हे मोठे समाजकारण क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सारथी ग्रुप करत आहे याचे सर्वांनी अनुकरण करावे असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, आपटे रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरातील 200 घरेलू कामगार भगिनींना छत्री व रेनकोट वाटप करण्यात आले.
सौ. मंजुश्री खर्डेकर आणि श्री.सुनील पांडे यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट केली, तसेच या भगिनींना कोणत्याही प्रकारची मदत भासल्यास आम्ही सदैव उपलब्ध असल्याची गवाही ही त्यांनी दिली. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तर अभिजित मोडक यांनी आभार प्रदर्शन केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com