Dr. Apoorva Palkar as the first Vice-Chancellor of Kaushal University
डॉ.अपूर्वा पालकर कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी
पुणे : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ.अपूर्वा पालकर यांची निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र – कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कौशल्य आणि उद्योजकता या विषयांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, विद्यार्थ्यांसाठी कालसुसंगत अभ्यासक्रम व उद्योजकता कौशल्य देण्याचा प्रयत्न या मिळालेल्या संधीच्या निमित्ताने करीन.
– डॉ.अपूर्वा पालकर
राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालयाने बुधवारी यासंबंधीची अधिसूचना काढली. डॉ.पालकर या अहमदाबाद मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएचडी केली आहे. त्यांचा या क्षेत्रात जवळपास २५ वर्षाचा अनुभव आहे. डॉ.पालकर यांना प्रतिष्ठित रवी जे मथाई नॅशनल फेलोशिप अवॉर्ड देखील मिळाले आहे.
चार वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन सेलच्या संचालकपदी निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला अटल या इनोव्हेशन मधील राष्ट्रीय क्रमवारीमध्ये देशात आठवे स्थान मिळाले आहे. या विद्यापीठात इनोवेशन सेलच्या स्थापनेपासून त्यांनी सुरुवात केली असून आज ४० स्टार्टअप विद्यापीठात सुरू आहेत तर बाहेरील ३७५ स्टार्ट अप सोबत विद्यापीठ काम करत आहे.
त्यांच्या कार्यकाळात युनिवर्सलायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टीम हा मोठा प्रकल्प विद्यापीठात साकारण्यात आला. कोविड काळात विद्यापीठात ई अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या चार वर्षाच्या काळात १०३ संस्थांसोबत सामंजस्य करार झाले, त्यामध्यातून अनेक नामांकित संस्थांशी विद्यापीठ जोडले गेले. तर स्मार्ट सिटी प्रकल्प, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत विद्यापीठाला जोडण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
राज्य उच्च शिक्षण परिषद सदस्य, केंद्र सरकारच्या कौशल्य आयोग सदस्य, उच्च शिक्षणाचे वैश्विकिकरण टास्क फोर्सच्या निमंत्रक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तर अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोर्डवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com