Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Social Equality Program
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम
महिला मेळावा आणि तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्राचे वाटप
पुणे :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे महिला मेळावा व तृतीयपंथी व्यक्तींसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक निशादेवी बंडबर, समाज कल्याण उपायुक्त रविंद्र कदम पाटील, साधना रणखंबे, सहायक आयुक्त संगिता डावखर, नीता होले, तृतीयपंथी तक्रार निवारण सोनाली दळवी, बिंदू माधव खिरे, भूमी फाऊंडेशनचे कैलास पवार, पुणेरी प्राईडचे प्रसाद गोंडकर, मित्र क्लिनीकचे अनिल उकरंडे, कै.अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्टचे डॉ.विजय मोरे आदी उपस्थित होते.
महिला मेळाव्यात श्रीमती होले यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. श्रीमती रणखंबे आणि बंडगर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट आपल्या भाषणातून मांडला.
तृतीयपंथीयांसाठी जनजागृती मेळावा
तृतीयपंथीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मेळाव्यात तृतीयपंथी व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले आणि त्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. श्री.कदम पाटील यांच्या हस्ते २० ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १५४ तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात आले आहेत.
तृतीयपंथीय व्यक्तींना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.कदम पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक कार्यालयानेदेखील तृतीयपंथीयांसाठी एक स्वच्छतागृहाची सुविधा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तृप्ती रामाने यांनी तृतीयपंथीयांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती डावखर यांनी सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त तृतीयपंथीयांसाठी समाज कल्याण कार्यालयात स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आल्याचे सांगितले. तृतीयपंथीय व्यक्तींनी ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्रासाठी ‘ट्रान्सजेंडर पोर्टल’वर नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.
Hadapsar News Bureau.