Mumbai Doordarshan’s famous news reporter Dr. Vishwas Mehendale passed away due to old age
मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ.विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळानं निधन
मुंबई : मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं मुलुंड पूर्व इथं त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. डॉक्टर विश्वास मेहेंदळे दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक निवेदक, संपादक होते. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक पुणे विद्यापीठाच्या जाहिरात विभागाचे माजी प्रमुख, ईएमआरसीचे संचालक, सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संचालक होते. त्यांनी 38 हून अधिक पुस्तकांचे लेखन केल असून आठ एकपात्री प्रयोगांचे शेकडो प्रयोग केले. पुण्याच्या पीडीए नाट्यसंस्थेच्या अनेक नाटकांमधून अभिनय केला. व्यावसायिक रंगभूमीवरही 7 नाटकांचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली
“माध्यम क्षेत्रातील अभ्यासू वाटाड्या हरपला”
माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रवाहात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे, मार्गदर्शक असे वाटाड्या व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी माध्यमांच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांची शैलीही अनेकांना भावणारी अशी होती. त्यांनी माध्यमांच्या बदलत्या प्रवाहाच्या काळात स्वतः प्रयोगशील राहून नव्या पिढीला तंत्रज्ञान, सादरीकरण यातील अनेक पैलूंची ओळख करून दिली. त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणादायी आणि स्मरणात राहील. त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसाठी वाटाड्या सारखेच होते. ज्येष्ठ माध्यमातज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’
डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यम क्षेत्रातील मार्गदर्शक हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यम विश्वातील एक मार्गदर्शक हरपला. आपले विचार संयतपणे मांडून त्यावर ठाम राहणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी लेखक, निवेदक आणि पत्रकार आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, विश्वास मेहेंदळे केवळ एक लेखक नव्हते. ‘पाच सरसंघचालक’ ‘यशवंतराव ते विलासराव’, ‘आपले पंतप्रधान’ ही त्यांची गाजलेली काही पुस्तके असली तरी पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक संस्था होते. संयतपणे आणि विचारांवर ठाम राहत निःपक्षपाती पत्रकारिता कशी करता येते, याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने शिकवण दिली. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
एक सजग अभ्यासू पत्रकार गमावला: सुधीर मुनगंटीवार
दूरदर्शनचे पहिले वृत्त निवेदक, पुणे तरूण भारतचे माजी संपादक, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन चे संस्थापक, राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य संचालक डॉ.विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने एक जाणता पत्रकार आणि अभ्यासू लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले की डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी प. पू. डॉ. हेडगेवार ते मा. सुदर्शनजी अशा क्रमशः पाच सरसंघचालकांच्या चरित्र आणि कार्यावर “पाच सरसंघचालक” हे पुस्तकही लिहिलं आहे.
स्वतंत्र पत्रकाराच्या नजरेतून या पुस्तकात त्यांनी संघकार्याच्या दीर्घकाळाचा रोचक आढावा घेतला आहे. स्व.श्री.मेहेंदळे यांनी लिहिलेली विविध पुस्तके, त्यांनी घेतलेल्या मुलाखती, दूरदर्शनसाठी त्यांनी निर्मिलेले अनेक वृत्रपट यातून त्यांची अभ्यासू वृत्ती उठून दिसली.
राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. एक सजग पत्रकार म्हणून राजकीय क्षेत्रासोबतच त्यांचा राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा अभ्यास स्तिमित करणारा होता, त्याचबरोबर ते एक चांगले वक्ताही होते, असे ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
डॉ. विश्वास मेहेंदळे यांना ईश्वर सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com