Droupadi Murmu crosses the 50% mark of votes in the third round; Set to become President of India
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या फेरीअखेर द्रौपदी मुर्मू यांना निर्णायक आघाडी
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळवली आहेत.
प्रथम खासदारांच्या मतांची मोजणी झाली. त्यात ७४८ वैध मतांपैकी ५४० मतं मुर्मू यांना मिळाली, तर विरोधी पक्षांच्या आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मतं मिळाली.
दुसऱ्या फेरीत वर्णक्रमानुसार पहिल्या १० राज्यांची मत मोजण्यात आली. त्यात १ हजार १३८ वैध मतांपैकी मुर्मू यांना ८०९, तर यशवंत सिन्हा यांना ३२९ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीत १ हजार ३३३ वैध मतांपैकी मुर्मू यांना ८१२, तर सिन्हा यांना ५२१ मतं मिळाली. राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून निवड होत असल्याबद्दल द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, ईशान्य भारतातल्या दुर्गम भागात आदिवासी समाजात जन्म घेतलेली भारताची कन्या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होत आहे, यातून भारतानं एक इतिहास लिहिला असं ट्विट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.
हे ही अवश्य वाचा
पाटबंधारे आणि उर्जा विभागातील कनिष्ठ सहाय्यकापासून ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार
या निवडणुकीतले विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनीही मुर्मू यांचं अभिनंदन केलं आहे. त्या निर्भिडपणे आणि निप:क्षपातीपणे राज्य घटनेच्या रक्षक म्हणून काम करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे तसंच आपल्याला मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांचे सिन्हा यांनी आभार मानले आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मुर्मू यांचं अभिनंदन केलं आहे.
hadapsarinfomedia@gmail.com