In Dussehra gatherings of both factions of Shiv Sena, criticism and counter-measures against each other
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांमधे परस्परांवर टीका-प्रतिटीका
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यांमधे दोघांनीही परस्परांवर टीका केली. सामान्य शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात केला.
मुख्यमंत्री पदाबरोबरच शिवसेना प्रमुख पद मिळवण्यासाठी बंडखोराचे प्रयत्न आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे शिवाजीपार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात केली. देशावर प्रेम करणारा प्रत्येक जण आमचाच आहे, देश हाच आमचा धर्म आहे, आम्ही हिंदूत्व सोडलेलं नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.
महागाई, बेकारी, गरीबी, विषमता याविषयी नवं सरकार काहीच बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही, अशीही टीका त्यांनी केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी साथ द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.
शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदान दोन्ही मैदानं दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लोकांमुळे पूर्ण क्षणतेनं भरली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करताना महापालिका निवडणुकीचं बिगुलच या मेळाव्यातून वाजवलं गेलं
दरम्यान, गेले काही दिवस ज्याची चर्चा होती, त्या शिवसेनेतल्या दोन गटांचे मेळावे मुंबईत झाले आणि या मेळाव्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यात शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांसमोर नतमस्तक होत नंतर ठाकरेंवर तोफ डागली.
उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला कटप्पाची उपमा दिली तर शिंदेंनी गद्दार आम्ही नाही तर तुम्हीच असं म्हणत पलटवार केला. शिवाय मविआ सरकार स्थापन झालं तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना दाढी तोंडात गेली होती का? असा तिखट सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला शिंदेंनी उत्तर दिलं.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असून आमच्यावर होणार अन्याय झुगारून टाकण्यासाठी आम्हाला उठाव करावा लागला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
खासदार, आमादार बाहेरील राज्यातले शिवसेनेचे नेते यांनी आम्हाला पाठिंबा दिला यावरून उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावं, अशी टीका त्यांनी केली. आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केला. क्रांती केली. परिवर्तन केलं असं ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com