Government’s emphasis on education and empowerment of girls
मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर
– मंत्री चंद्रकांत पाटील
जिल्ह्यातील १०१ गरजू विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किटचे वाटप
कोल्हापूर : महिला सक्षमीकरणासाठी मुलींना दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुलींना आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सोयी- सुविधा उपलब्ध करुन देवून दर्जेदार शिक्षण आणि महिलासक्षमीकरण यावर राज्य शासनाच्या वतीने भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना आरबीएल बँकेच्या वतीनेसामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत (उमीद १००० अंतर्गत) १०१ सायकली व शालेय वस्तूंच्या किटचे वाटप राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला.
आरबीएल बँकेच्या वतीने विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे ग्रामीण भागात दूरवरुन शाळेत चालत जाणाऱ्या विद्यार्थिनींची निश्चितच सोय होईल. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे.बँकांसह अन्य विविध प्रकारच्या संस्थांनी सामाजिक कार्यासाठी तसेच समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, शिक्षण ही मुलींच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दूरवरुन शाळेत चालत जाणाऱ्या मुलींची सायकल मुळे सोय होईल. विद्यार्थिनींना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देवून मुलींची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आरबीएल बँकेच्या वतीने अभिजित सोमवंशी म्हणाले की, सीएसआर उपक्रमाअंर्तगत उपेक्षित समुदायांना मदत करण्यासाठी बँकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतातील विविध शहरांमध्ये १००० हून अधिक सायकली आणि स्कूल किट्स वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. सायकलमुळे शाळेत जाण्याची सोय झाल्याबद्दल उपस्थित विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com