Education is the key to empowerment of every person including the disabled”
“शिक्षण ही दिव्यांगजनांसह प्रत्येक व्यक्तिच्या सक्षमीकरणाची गुरुकिल्ली आहे”
– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
दिव्यांग व्यक्तींना सन्मानाचं आयुष्य जगता यावं आणि सर्व क्षेत्रात कोणत्याही भेदभावाशिवाय भाग घेता यावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त
नवी दिल्ली: “शिक्षण ही दिव्यांगजनांसह प्रत्येक व्यक्तिच्या सक्षमीकरणाची गुरुकिल्ली आहे”, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवस साजरीकरणाच्या आजच्या सरकारी समारंभाच्या त्या मुख्य अतिथी होत्या. दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत, वर्ष २०२१ आणि २०२२ साठीचे, दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार वितरीत करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
दिव्यांगजनांच्या समस्यांविषयी समाजात जाणीवजागृती वाढावी हा दिव्यांगजन दिन साजरा करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात वर्ष २०२१ साठी २५ व्यक्ती, संस्था आणि संघटनांना तर वर्ष २०२२ साठी २९ व्यक्ती, संस्था आणि संघटनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांग बाल आणि बालिका, दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ व्यक्ती आणि सर्वश्रेष्ठ पुनर्वसन व्यावसायिक कार्यकर्ता यासह विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यातल्या अकोला जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातल्या दिव्यांगांचं सर्वेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्हा ठरण्याचा मान पटकावला. आजच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०२१’नं गौरवण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अपंगत्वावर मात करत यशस्वी उद्योजक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या नागपुरातल्या जयसिंग चव्हाण यांना यावेळी सर्वश्रेष्ठ दिव्यांग पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com