Education Ministry to recognize in-service training received by Agniveers as credits for graduation
शिक्षण मंत्रालय, अग्निवीरांचे सेवा प्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमांसाठी, ग्राह्य धरणार
नवी दिल्ली : भारतीय तरुणांना सशस्त्र दलांमध्ये सेवा देता यावी यादृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने 14 जून 2022 रोजी अग्निपथ नावाच्या आकर्षक भरती योजनेला मंजुरी दिली आणि या योजनेअंतर्गत निवडलेले तरुण अग्निवीर म्हणून ओळखले जातील. अग्निपथ ही योजना देशभक्त आणि ध्येयाने प्रेरित तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सेवेची सुविधा उपलब्ध करून देतो. या योजनेअंतर्गत निवडलेले तरुण अग्निवीर म्हणून ओळखले जाणार आहेत.
आपल्या अग्निवीरांच्या भविष्यातील करिअरच्या संधी वाढवण्यासाठी आणि नागरी क्षेत्रातील विविध नोकऱ्यांसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी, शिक्षण मंत्रालय सेवेत असलेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष, तीन वर्षांचा कौशल्य आधारित पदवी कार्यक्रम सुरू करणार आहे. कार्यक्रम त्यांना संरक्षण आस्थापनांमधील सेवेदरम्यान मिळालेल्या कौशल्य प्रशिक्षणाला मान्यता देईल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नूद्वारे रचना केलेल्या आणि अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत, पदवीसाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी 50% गुण अग्निवीरला मिळालेल्या तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक दोन्ही कौशल्य प्रशिक्षणातून मिळतील.आणि उर्वरित 50% गुण भाषा, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र, गणित, शिक्षण, वाणिज्य, पर्यटन, व्यावसायिक अभ्यासक्रम , कृषी आणि ज्योतिष यासारख्या विविध विषयांच्या तसेच इंग्रजीमधील पर्यावरण अभ्यास आणि संप्रेषण कौशल्यांवरील क्षमता बांधणी अभ्यासक्रम या विषयांच्या निवडलेल्या अभ्यासक्रमांमधून प्राप्त होतील.
हा कार्यक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाचे मापदंड आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अनिवार्य केल्यानुसार राष्ट्रीय गुण आराखडा / राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (एनएसएफक्यू ) यानुसार रचना केलेला आहे. यामध्ये प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर पदवीपूर्व प्रमाणपत्र, प्रथम आणि द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर पदवीपूर्व पदविका आणि तीन वर्षांच्या कालावधीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडण्याची तरतूद देखील आहे
या कार्यक्रमाच्या आराखड्याला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई ) आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीइटी ) आणि विद्यापीठ अनुदान आयोग या संबंधित नियामक संस्थांनी मान्यता दिली आहे. इग्नूद्वारेद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामपद्धतीनुसार (कला पदवी ; वाणिज्य पदवी .;कला पदवी (व्यावसायिक); कला पदवी (पर्यटन व्यवस्थापन), पदवी प्रदान केली जाईलआणि रोजगार आणि शिक्षणासाठी भारतात आणि परदेशात या पदवीला मान्यता असेल.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दल इग्नू( IGNOU)सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील.
हडपसर न्युज ब्युरो