Election of Rahul Narvekar as the Speaker of Maharashtra Assembly.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर याची निवड.
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतं मिळवून आज विजयी झाले. भाजपा, एकनाथ शिंदे गटातले आमदार, बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनाच्या विधानसभा सदस्यांनी नार्वेकर यांना मतदान केलं.
रविवारी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. गतवर्षी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हापासून उपसभापती नरहरी झिरवाळ कार्याध्यक्षाची भूमिका बजावत होते.
त्यांना एकूण १६४ मतं मिळाली. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटातले आमदार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या १०७ आमदारांनी मतदान केलं. समाजवादी पक्ष आणि AIMIM पक्षाच्या आमदारांनी निवडणुकीत मतदान केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजपाचे २, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, MIM चे एक आमदार सभागृहात मतदानावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळं १६४ सदस्यांची मतं मिळवून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याची घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली.
शिवसेनेचे गटनेते तेच असल्याचा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना भाजपचे सभापती उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करण्यास सांगणारा व्हीप जारी केला. त्यांच्या व्हीपमध्ये आदित्य ठाकरेंसह उद्धव गटातील सर्व आमदारांचा समावेश आहे
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं.
नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी नार्वेकर यांना सन्मानानं अध्यक्षांच्या खुर्चीकडे नेलं.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांचं अभिनंदन केलं. आपण निःपक्षपाती काम कराल आणि तरुणांना, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाधिक प्राधान्य द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देशात आतापर्यंत लोक विरोधी पक्षातून सत्तेत जात होते. आम्ही ८-९ मंत्र्यांसह सत्तेतून बाहेर निघालो, देशात पहिल्यांदाच असं घडलं असेल, असं शिंदे म्हणाले. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी कुणालाही जोर जबरदस्तीनं अडवून ठेवलं नाही, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला.
नार्वेकर हे देशातले आणि राज्यातले सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे नार्वेकर यांचे सासरे आहेत. हा दुर्मिळ योगायोग असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
2 Comments on “महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर याची निवड.”