Emphasis on Coronation Prevention, Vaccination, Survey – Collector Dr Rajesh Deshmukh
कोरोना प्रतिबंधासाठी तपासणी, लसीकरण, सर्वेक्षणावर भर द्या- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
दुसरी मात्रा न घेतलेल्यांचे महिनाभरात लसीकरण पूर्ण करण्याचेही दिले निर्देश
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड तपासणी, लसीकरण, सर्वेक्षण यावर विशेष भर देणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा डोस घेणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे येत्या महिनाभरात लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
पुणे ग्रामीण कोविड व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिरुरचे प्रांताधिकारी संतोष देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
कोविड रुग्णांच्या संख्येत ५ जूनअखेर संपलेल्या आठवड्यात आधीच्या आठवड्याच्या तुलनेत ५० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना तपासणी, लसीकरणाचे तालुक्यांनी केलेल्या नियोजनुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधासाठी ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
कोविड लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. लसीची दुसरी मात्रा घेणे प्रलंबित असलेल्या साडेसहा लाख लाभार्थ्यांचे येत्या महिनाभरात संपूर्ण लसीकरण करण्यात यावे.
१२ ते १४ वयोगट तसेच १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या यादीनुसार घरोघरी भेट देऊन लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
आगामी वारीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वारीमार्गावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
कोविड रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणीवर अधिक भर देणे आवश्यक असून त्यासाठी नमुन्यांची संख्या वाढवणे; चाचणी सकारात्मक आलेल्या रुग्णांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग करुन तपासण्या करणे; इन्फ्लुएंझा सदृश्य आजार (आयएलआय) तसेच अतीतीव्र श्वसनमार्ग आजार संसर्ग (सारी) याबाबतचे सर्वेक्षणाची व्यवस्था बळकट करणे याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे.
प्रत्येक तालुक्यात किमान एक कोविड काळजी केंद्र (सीसीसी) उभे करण्याचे नियोजन करण्यात यावे. ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन चांगले असून भविष्यातही तो पुरेसा राहील याकडे लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील लसीकरण, कोरोना तपासण्या, ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत आढावा घेण्यात आला.
डॉ. पवार यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना लसीकरण, तपासण्या वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. सर्व तालुक्यात किमान एक कोविड केअर सेंटरचे नियोजन करावे असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
हडपसर न्युज ब्युरो