Emphasis on modernization of police force for world-class policing – Chief Minister Uddhav Thackeray
जागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र पोलिसांच्या डायल ११२ आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचे उद्घाटन
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिसिंग व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे.
हडपसर मराठी बातम्या समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी राज्यशासन खंबीर उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सेंट्रल हॉलमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
उपस्थित समुदायाला गुढी पाडव्याच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आजपासून कोरोनाचे निर्बंध उठवले असले तरी पोलिसांच्या कामामध्ये फारसा बदल झालेला नाही. कोरोनामध्ये निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तर आता नेहमीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे.
अलीकडच्या काळात सायबर क्राइमचा व्हायरस देखील मोठा होतोय, त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. याचा देखील आपले पोलिसदल सक्षमपणे मुकाबला करेल यात शंका नाही. पोलीस आपल्या मदतीला आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कार्यरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पुरेसा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नवे नवे पर्याय शोधून काढत असतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस दलाचेही सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यात देखील पोलीस दलाला आवश्यक तो निधी देण्यात येईल.
आज कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक कायदे केले जात आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी कारण्याबरोबच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सर्वांनी आपली जबाबदारी ओळखली पाहीजे. पोलिस दलाला कोणताही डाग लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस दलाने इतर विभागांना सहकार्य करावे. या सहकार्यामुळे राज्य सरकारला उत्पन्न मिळेल आणि त्यातून पोलिस दलाला आणखी सुविधा पुरविण्यास निधी उपलब्ध करून देणे शक्य होईल.
पोलिसांनी कायम दक्ष रहावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले, राज्याचे पोलिस दल हे देशातील प्रतिभाशाली आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाते. नक्षलवाद, दहशतवाद, गुंडगिरी, राजकीय-सामाजिक आंदोलने, त्यासोबतच बदलत्या काळातील नवीन आव्हाने म्हणून सायबर क्षेत्रातील गुन्हेगारी, आर्थिक घोटाळे अशा सर्व प्रकारच्या आव्हानांना आपले पोलीस दल सक्षमपणे सामोरे जात आहे.
पोलीस दलाला बळ देण्याबरोबरच, त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास असला तरी “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदाप्रमाणे कायम दक्ष राहण्याची गरज आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल ११२ जनतेचे कॉल तात्काळ व विना अडथळा घेता यावेत, या करीता प्राथमिक संपर्क केंद्र, नवी मुंबई व व्दितीय संपर्क केंद्र, नागपूर अशा दोन ठिकाणी संपर्क केंद्र प्रस्थापित करण्यात आली आहेत.
डायल ११२ यंत्रणेव्दारे मदत घेण्याकरिता नागरीक टेलिफोन, मोबाईलद्वारे संपर्क करू शकतात. नागरिकांनी केलेले कॉल संपर्क केंद्राद्वारे संबंधीत जिल्हयाच्या पोलीस नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येतील, त्यासाठी पोलीस दलातील ११ पोलीस आयुक्तालये व ३४ जिल्हे अशी एकुण ४५ पोलीस नियंत्रण कक्ष अद्यावत करण्यात आली आहेत.
जिल्हा नियंत्रण कक्ष संपर्क केंद्राकडून प्राप्त झालेल्या कॉलच्या माहितीचे विश्लेषण करून हा कॉल व त्याची माहिती या यंत्रणेच्याव्दारे संबधीत आपत्कालीन प्रतिसाद वाहनावरील प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडील मोबाईल डेटा टर्मिनल वर पाठवते.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून माहिती प्राप्त होताच आपत्कालीन प्रतिसाद वाहनावरील पोलीस अधिकारी/ अंमलदार मदत हवी असणाऱ्या नागरिकांच्या ठिकाणी तात्काळ पोहचतात व त्यास कायदेशीर मदत करतात.
आपत्कालीन प्रतिसाद वाहनावरील पोलीस अधिकारी/ अंमलदार यांनी योग्य कार्यवाही केल्यानंतर त्याबाबतची नोंद मोबाईल डेटा टर्मिनल (MDT) मध्ये घेतात. ही सर्व प्रक्रिया यंत्रणेच्या संगणकीय प्रणालीमध्ये जतन (Save) होते, राज्यातील जनतेला तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याकरीता १२६९ चारचाकी व १३५९ दुचाकी गाड्यांवर मोबाईल डेटा टर्मिनल (MDT), जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या प्रकल्पाकरिता ही वाहने पूर्णपणे आपत्कालीन प्रतिसादाकरिता (२४ X ७) उपलब्ध असतील.
Hadapsar News Bureau.