Emphasis on vaccination of teachers and students against the backdrop of increasing corona patients
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर
मुंबई : राज्यातल्या काही भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहे. त्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा घ्यावी यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
१२ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांचंही लसीकरण वाढविण्याचं यात सांगण्यात आलंय. ताप किंवा कोरोनाची इतर लक्षणं असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळेत पाठवू नये. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळली तर तत्काळ त्यांचं विलगीकरण करुन त्यांची अँटीजेन किंवा RTPCR चाचणी करावी.
कोरोनाबाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करावी, असं सरकारनं कळवलं आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती करतानाच कोरोनाविषयक दिशानिर्देशांचं पालन करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात शुक्रवारी १ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल १ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ३ हजार ८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. सध्या राज्यात १३ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोंदिया जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद नाही, तर नंदुरबार, धुळे, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे.
मुंबईत काल १ हजार ९५६ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी १ हजार ८७३ रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं नाहीत. ८३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ७६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईतला रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे.
हडपसर न्युज ब्युरो