Employment for 13 thousand unemployed in the state in September
राज्यात सप्टेंबरमध्ये १३ हजार बेरोजगारांना रोजगार
– कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
नोकरीइच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी
मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये १३ हजार ०२४ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महास्वयं वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते’.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९८ हजार ४०७ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, माहे सप्टेंबर २०२२ मध्ये विभागाकडे ३६ हजार ६३४ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ४ हजार ५६८, नाशिक विभागात ४ हजार ४०६, पुणे विभागात १५ हजार ५९०, औरंगाबाद विभागात ७ हजार ६४५, अमरावती विभागात २ हजार ०२८ तर नागपूर विभागात २ हजार ३९७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ०२४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार ३४६, नाशिक विभागात १ हजार ४७४, पुणे विभागात ३ हजार ७१३, औरंगाबाद विभागात सर्वाधिक ३ हजार ७३३, अमरावती विभागात ९८० तर नागपूर विभागात ७७८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित महारोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com