Empowerment of women through sports
खेळांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण
महिलांमधील क्रीडा प्रतिभा समोर आणण्यासाठी ‘खेलो इंडिया दस का दम’ हे व्यासपीठ प्रदान
आगामी दोन आठवडे भारताच्या महिला शक्तीचा उत्सव
मुंबई : खेळाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण.आणि यासाठी प्रेरणा देणारे खेलो इंडिया दस का दम हे एक भव्य अभियान आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाने 10 ते 31 मार्च दरम्यान ‘खेलो इंडिया दस का दम ‘या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
2023 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा आरंभ काल नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे झालेल्या उद्घाटन समारंभात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
देशातील 50 हून अधिक शहरांमध्ये एकाच वेळी या स्पर्धेला सुरुवात झाली.अशा प्रकारचा क्रीडा उपक्रम प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होत आहे आणि केंद्रीय मंत्रालयाने या स्पर्धेसाठी एकूण रु. 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
अनेक महिन्यांपासून देशभरात सुरू असलेल्या विविध खेलो इंडिया महिला लीगच्या यशावर स्वार होऊन, दस का दम उपक्रम देशभरातील हजारो महिलांना आणखी संधी प्राप्त करून देईल. 10 ते 31 मार्च या कालावधीत भारतातील 26 राज्यांमधील 50 हून अधिक शहरांमध्ये एकूण 10 क्रीडा उपक्रमामध्ये सुमारे 15,000 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचा महत्त्वाचा समन्वयक म्हणून, भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र मुंबई ,विविध राज्य संघटनांसह महाराष्ट्रातील निवडक शहरांमध्ये खेलो इंडिया दस का दम स्पर्धा 2023 चे आयोजन करत आहे.
10 विविध क्रीडा संघटना महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती आणि औरंगाबाद या चार शहरांमध्ये महिला खेळाडूंसाठी तिरंदाजी, ऍथलेटिक्स, तलवारबाजी, खो-खो, हॉकी, ज्युडो, वुशू, जलतरण, भारोत्तोलन आणि योगाभ्यास यासह विविध स्पर्धांचे आयोजन करत आहे .
विख्यात खेळाडू आणि आघाडीच्या क्रीडापटूंनी या आगामी क्रीडा उपक्रमासाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे. आपल्या मुली आणि महिला खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून हे क्रीडापटू सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहून या स्पर्धांची शोभा वाढवणार आहेत.
राष्ट्रीय/राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ न शकलेल्या महिला खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि आतापर्यंत न पोहोचलेल्या भौगोलिक क्षेत्रात स्पर्धात्मक खेळ पोहोचणे सुनिश्चित करणे हा या स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रांच्या मुंबईच्या प्रशासकीय क्षेत्रामधील संबंधित राज्य सरकारे उदा. महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेशातील दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांनीही महिला दिनानिमित्त 10 मार्च ते 25 मार्च या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन, योग, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि तिरंदाजी या स्पर्धांचे आयोजन केले आहे.राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने कार्यालयीन महिला कर्मचार्यांसाठी मनोरंजनपर कार्यक्रम आणि गुणवंत खेळाडूंचा सत्कारही आयोजित केला जात आहे.
गोवा आणि केंद्रशासित प्रदेशातील दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये, संबंधित राज्य सरकारांनी कराटे, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ यासारख्या खेळांचे आयोजन केले आहे, यामध्ये काही कार्यक्रमांमध्ये 1000 हून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहेत.
महिला दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून खेलो इंडिया केंद्रे आणि राज्यांमधील खेलो इंडिया मान्यताप्राप्त अकादमी अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. आगामी दोन आठवडे भारताच्या महिला शक्तीचा उत्सव म्हणून स्मरणात राहतील. जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासोबतच क्रीडा उपक्रम यांना प्रोत्साहन देण्यास यामुळे मदत होईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com