Foreign visitors will enjoy the ‘Heritage Walk’
परदेशी पाहुणे घेणार ‘हेरिटेज वॉक’ चा आनंद
जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!!
पुणे : पुण्याचे वैभव मानले जाणारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ऐतिहासिक वास्तू जी २० देशांतील पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. दीडशे वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू, येथील विविध संग्रहालये, भुयार, येथील जैवविविधता या पाहुण्यांना ‘हेरिटेज वॉक’ च्या निमित्ताने अनुभवता येणार आहे.
जी २० च्या निमित्ताने पाहुण्यांच्या स्वागतासाठी लागलेले स्वागताचे फलक, रंगरंगोटी आणि घातले जाणारे मांडव यामुळे विद्यापीठातील वातावरणात एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळत आहे. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील लगबग पाहायला मिळत आहे.
या पाहुण्यांना या वास्तूचा या एकूणच परिसराची माहिती व्हावी या अनुषंगाने विद्यापीठाने यांच्यासाठी हेरिटेज वॉक चे आयोजन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१८ सालापासून बाहेरील नागरिकांसाठी ‘हेरिटेज वॉक’ सुरू केला आहे. या निमित्ताने विद्यापीठासह बाहेरील नागरिक दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी विद्यापीठात येत ही वास्तू पाहू शकतात, त्याबाबत माहिती घेऊ शकतात. मुख्य इमारतीत असणारे भुयार, येथील ऐतिहासिक संग्रहालय, व्यंगचित्रकला संग्रहालय, इतिहास आणि मानवशास्त्र विभागाचे संग्रहालय पाहू शकतात. येथील निसर्गरम्य परिसर अनेकांना भुरळ घालतो. या सगळ्या गोष्टींची माहिती या परदेशी पाहुण्यांना देखील व्हावी या अनुषंगाने विद्यापीठाने या हेरिटेज वॉक चे आयोजन केले आहे. इतिहास विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी या पाहुण्यांना याची माहिती देतील असे इतिहास विभाग प्रमुख व हेरिटेज वॉक समितीच्या सदस्य डॉ.श्रद्धा कुंभोजकर यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com