Entrepreneurs should come forward to implement new initiatives regarding cleanliness – Guardian Minister Chandrakant Dada Patil
स्वच्छतेबाबत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद
पुणे : पुण्याचे उद्योग संशोधन आणि उत्पादनात पुढे आहेत. स्वच्छतेबाबतही उपयुक्त संशोधन करीत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे आणि पुण्याला स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांसाठी शहर स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होणे असे तीन महत्वाचे विषय आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून उत्पन्न घेण्याचे प्रयोग गरजेचे आहेत. अशा विषयांबाबत चांगल्या सूचना चेंबरने कराव्यात.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्यांना कचरा वेचण्यासाठी आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांना काही प्रमाणात वस्तूंच्या स्वरूपात मदत करून त्यांची कार्यक्षमता वाढवता येईल. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसारखे प्रकल्प राबविण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य महत्वाचे ठरेल. स्वच्छतेबाबत सर्व संबंधित घटकांचा सहभाग वाढवून जनप्रबोधनावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊस बंद होताच ही कामे सुरू करण्यात येईल. एनडीए चौकातील वाहतूक समस्याही दूर होत आहे, असेही श्री.पाटील म्हणाले.
डॉ.मेहता यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. शहर स्वच्छ करण्यासाठी शासन आणि प्रशासनासोबत चेंबर काम करेल. स्वच्छतेचे उद्दीष्ट सामुहिक प्रयत्नातून साध्य करता येईल असे ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com