Proper management should be done to get equal water everywhere in Pune city- Deputy Chief Minister Ajit Pawar
पुणे शहरात सर्वत्र समान पाणी मिळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खडकवासला प्रकल्पातून सिंचनाची दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय
पुणे : खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन नवा मुठा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. पुणे शहरातही महानगरपालिकेने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन सर्वत्र समान पाणी मिळेल, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
खडकवासला प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली.
खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा २.५ टीएमसी पाणी कमी आहे, अशी माहिती बैठकीत यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी, परंतु सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. पुणे महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.
आमदार चेतन तुपे यांनी खराडी ते साडेसतरा नळी पाईपलाईनद्वारे भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी उचलण्याचा पर्याय सुचवला. त्यावर याबाबत व्यवहार्यता, तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी महानगरपालिकेला दिल्या. आमदार श्री. तापकीर यांच्या मागणीनुसार शहरात नवीन समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अतिरिक्त पंप ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
सध्या राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असून नुकतीच २४ हजार मेगावॅटपर्यंत गेली आहे. भविष्यातही ही मागणी वाढण्याची शक्यता असून अतिरिक्त वीज उपलब्ध करुन घेण्यासाठी एनटीपीसीकडून तसेच नॅशनल ग्रीडमधून वीज घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, भविष्यातही वीजेच्या समस्येला गृहीत धरुन पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असेही ते म्हणाले.
Hadapsar News Bureau.