Establishment of ‘Industry Academia Forum’ at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमची’ स्थापना
कौशल्य विकास विभागाचा उपक्रम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमची’ स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाची सुरुवात म्हणून कौशल्य विकास केंद्रामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनावणे, आंतरशाखीय अभ्यासमंडळाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, कौशल्य विकास विभागाचे संचालक व वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विधी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती भाकरे, कौशल्य विकास विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने फोरमचे उद्घाटन करण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकत्रित विचाराने विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रमांचे नियोजन करणे हे इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमचे उद्दिष्ट असून याद्वारे आगामी काळात विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता व कार्यकुशलता वृद्धिंन्गत करण्यासाठी व त्यांच्यामध्ये अद्ययावत ज्ञान व कौशल्ये विकसित करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाईल असे कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.
या सभेसाठी औद्योगिक क्षेत्रातील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ आणि उच्चपदस्थ उपस्थित होते. यामध्ये क्लीनमॅक्स एनर्जी उद्योगाचे व्यवस्थापक धनंजय नांदेडकर, पनामा उद्योगसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल नलावडे, कल्प पॉवर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश कटारिया, औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य राम काकडे, कमिन्स उद्योगाचे माजी व्यवस्थापक सुनील बर्वे, टेक्नोराईट्स संस्थेचे संचालक मकरंद पंडित, बी एम सी आंतरराष्ट्रीय कंपनीचे माहिती रचना व विकसन विभागाचे संचालक परेश नाईक, बीएमसी आंतरराष्ट्रीय कंपनीच्या इन्फर्मेशन डिझाईन अँड डेव्हलपमेंट विभागाचे संचालक परेश नाईक, बीएमसी आंतरराष्ट्रीय कंपनीच्या इन्फर्मेशन डिझाईन अँड डेव्हलपमेंट विभागाच्या व्यवस्थापक अश्विनी मठद, बी. यू. भंडारी ऊर्जा कंपनीचे व्यवस्थापक मकरंद पारखे, मैत्रेय एनर्जी सोल्युशनचे संस्थापक प्रतीक गायकवाड यांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रत्यक्ष उद्योगांमध्ये प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी सहभागी अधिकाऱ्यांनी दिले. तसेच उद्योगक्षेत्रातील उपलब्ध संधी आणि त्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमांची गरज आहे याविषयी तज्ज्ञांनी बहुमोल मार्गदर्शन केले. डॉ. संजीव सोनावणे यांनी यावेळी कौशल्य विकासाची सद्यस्थितीत गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
आंतरशाखीय अभ्यासमंडळाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने यांनी तज्ञांसमवेत चर्चेत सहभाग घेऊन टेक्निकल रायटिंग कोर्समधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. पराग काळकर यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इंडस्ट्री अकॅडेमिया फोरम या कार्यक्रमाची संकल्पना कौशल्य विकास विभागाच्या डॉ. अंजली जगताप-रामटेके यांची होती तसेच त्यांनी या सभेसाठी निमंत्रक म्हणून काम पाहिले. डॉ. पूजा मोरे, डॉ. रवी अहुजा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व धनंजय मुंढे, अजित झेंडे, प्रियांका माने या सहकारी प्राध्यापकांनी सहकार्य केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com