Establishment of ‘UOM-SPPU Academy’ by Savitribai Phule Pune University and University of Melbourne
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मेलबर्न विद्यापीठाकडून ‘युओएम-एसपीपीयू अकॅडमी’ ची स्थापना
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीत आणि ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्न विद्यापीठ यांनी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी एकत्रितपणे ‘युओएम-एसपीपीयू अकॅडमी’ ची स्थापना केली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून या दोन्ही विद्यापीठांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना एकमेकांच्या विद्यापीठात जाऊन प्रशिक्षण व अध्यापन करता येणार आहे. तसेच संयुक्त प्रकल्पही हाती घेण्यात येतील.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाने अशा प्रकारे स्थापन केलेली ही पहिलीच अकॅडमी आहे. या अकॅडमीची स्थापना आभासी पध्दतीने एक वर्षभरपूर्वीच झाली असून आज याचे प्रत्यक्ष उद्घाटन ‘इंटरडिसीप्लिनरी स्कुल ऑफ सायन्स’ येथे करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, इंटरडिसीप्लिनरी स्कुल ऑफ सायन्स चे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार, मेलबर्न विद्यापीठाचे उपकुलगुरू मिशेल वेसले, सहायक उपकुलगुरू प्रा. मुथुपंडियन अशोककुमार, विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता प्रा. मोयरा ओब्रँन आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन नवीन अभ्यासक्रमांची निर्मिती
नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने ‘मेलबर्न ग्रॅज्युएट स्कुल ऑफ एज्युकेशन’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘फॅकल्टी ऑफ एज्युकेशन’ यांनी एकत्रित येत सामंजस्य करार केला. या करारानुसार वय वर्ष ३ ते १८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शिक्षकांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पदविका व पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात संशोधन, प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतील.
मेलबर्न विद्यापीठाबरोबर झालेल्या कारारातून सध्या आपण विज्ञान शाखेत अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ही केवळ सुरुवात असून भविष्यात सामाजिक शास्त्र, शिक्षणशास्त्र, डिजाईन थिंकिंग आदीही विषयात अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
यावेळी मेलबर्न विद्यापीठात सध्या संशोधन करणारी विद्यार्थिनी ऋचा पाटील म्हणाली, मी बीएस्सी ब्लेंडेड केल्यानंतर मेलबर्न विद्यापीठातून ‘एमएस्सी ब्लेंडेड’ केलं असून सध्या मेलबर्न विद्यापीठामध्ये संशोधन करत आहे. ऋचा म्हणाली, मेलबर्नमध्ये पुढील अभ्यासक्रम करण्यासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात, आपण केवळ संकेतस्थळावर जाऊन या सगळ्याची व्यवस्थित माहिती घेणे गरजेचे आहे.
मेलबर्न विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ असून त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सी(ब्लेंडेड) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र अशा चार विषयांचे मूलभूत शिक्षण दिले जाते. विद्यापीठाने बीएस्सी (ब्लेंडेड) पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांसाठी हे अभ्यासक्रमही सुरू केलेले आहेत.
Hadapsar News Bureau