Along with skill development, it will help to expand the scope of knowledge of the students
कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार
बरो ऑफ मॅनहटन कम्युनिटी कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (बीएमसीसी) मध्ये केवळ 20 टक्के शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी
मुंबई : मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील निश्चितच मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. याअंतर्गत जागतिक दर्जाच्या नामांकित शिक्षण संस्थांसोबत करार करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि न्यूयॉर्क येथील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान परस्पर शैक्षणिक सहकार्य विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.
या करारानुसार पात्र विद्यार्थ्यांना बरो ऑफ मॅनहटन कम्युनिटी कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (बीएमसीसी) मध्ये केवळ 20 टक्के शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण व प्रशिक्षणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचबरोबर संशोधन, अध्यापन, अभ्यासक्रम आदी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविले जाणार आहे.
शालेय शिक्षण विभाग आणि मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान झालेल्या या करारावर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी, तर मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोच्या वतीने शिक्षण विभागाचे अध्यक्ष अँथनी मुनरो यांनी स्वाक्षरी केली.
मंत्री श्री. केसरकर यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कराराप्रसंगी मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोचे उपाध्यक्ष संजय रामदत, शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक डॉ.कैलास पगारे, राजभवन येथील उपसचिव प्राची जांभेकर आदी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com