Centre pushes for increased exports of tissue culture plants; offers help to exporters to access new markets
टिश्यू कल्चर वनस्पतींच्या अधिक निर्यातीसाठी केंद्राचे प्रोत्साहन; नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी देऊ केली मदत
नवी दिल्ली : टिश्यू कल्चर केलेल्या म्हणजे ऊती संवर्धन पद्धतीने वाढविलेल्या वनस्पतींच्या निर्यातीला अधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने, अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून भारतभरातील जैवतंत्रज्ञान विभागाकडून मान्यताप्राप्त टिश्यू कल्चर प्रयोगशाळांसह “पर्णसंभार, रोपटी, कापलेली फुले आणि लागवडीसाठी उपयुक्त साहित्य यांसारख्या टिश्यू कल्चर वनस्पतींच्या निर्यातीला प्रोत्साहन” या विषयावर आधारित वेबिनारचे आयोजन केले होते.
भारताकडून टिश्यूकल्चर वनस्पतींची आयात करणाऱ्या प्रमुख 10 देशांमध्ये नेदरलँड्स, अमेरिका,इटली,ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, केनिया, सेनेगल, इथिओपिया आणि नेपाळ या देशांचा समावेश होतो. वर्ष 2020-21 मध्ये भारताने 17.17 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या मूल्याच्या टिश्यू कल्चर वनस्पतींची निर्यात केली आणि यातील सुमारे 50% माल नेदरलँड्सला पाठवण्यात आला.
या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांना अपेडाच्या अधिकाऱ्यांनी वरील देशांमध्ये टिश्यूकल्चर वनस्पतींना असलेल्या मागणीचे आधुनिक प्रकार आणि भारतीय निर्यातदार आणि टिश्यूकल्चर प्रयोगशाळांना नव्या बाजारांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अपेडा कशा प्रकारे मदत करू शकेल याबद्दल माहिती दिली.
भारतात लावण्यात येणाऱ्या टिश्यूकल्चर वनस्पतींची श्रेणी अधिक विस्तारण्यासाठी विशिष्ट वनस्पती अथवा पिकाचे उत्पादन घेणाऱ्या देशांकडून आयात करता येऊ शकेल अशा मूळपेशी जर्मप्लाझमची यादी देण्यास अपेडाने निर्यातदारांना सांगितले आहे.
तर भारतात उपलब्ध होणाऱ्या टिश्यूकल्चर केलेल्या वनस्पती, जंगलातील वनस्पती, कुंडीत लावण्यायोग्य वनस्पती, शोभिवंत आणि लँडस्केपिंगसाठीचे लागवड साहित्य अशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे प्रदर्शन करण्यासाठी अपेडाने देशात एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करावे अशी सूचना निर्यातदारांनी यावेळी केली.
भारतात टिश्यूकल्चर केलेल्या वनस्पतींसाठी नव्या बाजारपेठा शोधण्याच्या उद्देशाने अपेडाने एक व्यापारी प्रतिनिधीमंडळ परदेशी पाठविण्यात पुढाकार घ्यावा आणि आयातदारांशी चर्चा करून काही व्यापारी सौद्यांना अंतिम स्वरूप द्यावे अशी देखील सूचना त्यांनी केली.
टिश्यूकल्चर वनस्पतींशी संबंधित प्रयोगशाळांनी टिश्यूकल्चर करण्यासाठीच्या लागवड साहित्याचे उत्पादन आणि त्याची निर्यात यासंबंधीच्या अडचणी आणि आव्हानांची माहिती दिली. या कार्यक्रमात निर्यातदारांनी, वाढता विजेचा खर्च, प्रयोगशाळेतील कुशल कार्यबळाची कमी कार्यक्षमता पातळी, प्रयोगशाळांतील दुषित घटकांचे मिश्रण होण्याची समस्या, मायक्रोप्रपोगेटेड लागवड साहित्याच्या वाहतुकीचा वाढता खर्च इत्यादी समस्यांकडे अपेडाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
अपेडाने संबंधित विभागांकडे या समस्यांचा पाठपुरावा करावा अशी सूचना टिश्यूकल्चर तज्ञांनी यावेळी केली. टिश्यूकल्चर वनस्पती प्रयोगशाळांच्या अडचणी दूर करण्यासाठी अहोरात्र सेवा देण्याची खात्री अपेडाच्या अधिकाऱ्यांनी या प्रयोगशाळांच्या संचालकांना दिली.
हडपसर न्युज ब्युरो