Facilitate truck terminals in industrial areas immediately-Minister of Industries
औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा-उद्योगमंत्री
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक १ साठी येत्या १५ दिवसात वाहन तळाची (ट्रक टर्मिनल) सुविधा करण्यात यावी, असे निर्देश श्री. सामंत यांनी यावेळी दिले.
बैठकीला एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योजक आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुविधा भूखंडाची व्यवस्था करण्यात यावी. उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासोबत नवीन उद्योजक आकर्षित होतील अशा सुविधा विकसित कराव्या. पुण्यात चांगल्या शैक्षणिक संस्था आणि गुणवत्ता असल्याने नव्या जागेचा विकास करताना विद्यार्थ्यांकडून संकल्पना आणि सूचना मागविण्यात याव्या. तज्ज्ञांच्या मदतीने उद्योजकस्नेही असणारा परिसर विकास करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
उद्योगमंत्री सामंत यांनी तळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. रस्ता रुंदीकरणाबाबतही विचार करण्यात येईल. उद्योजकांच्या नोंदणीकृत संघटनेच्या कार्यालयासाठी भूखंड देण्यात येईल. उद्योग आणण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सामंत यांनी बैठकीपूर्वी तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक २ साठी जागेची पाहणी केली. जागेसाठी संमतीपत्र दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर प्रथम रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, भूखंडाचा विकास करताना उद्योगाच्या गरजा लक्षात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
श्री.सामंत यांनी जेसीबी उद्योगाला भेट देऊन माहिती घेतली. राज्यात उद्योगविस्तार करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com