Fake hallmarked gold worth over Rs 1.5 crore seized
दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क केलेले सोने जप्त
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या राज्यव्यापी मोहिमेत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क केलेले सोने केले जप्त
बीआयएस हॉलमार्कचे 3 भाग असून – त्यात बीआयएसचे चिन्ह, कॅरेटची शुद्धता आणि सूक्ष्मता आणि 6 अंकी अल्फान्यूमेरिक युनिक नंबर यांचा समावेश असतो
बिआय एस केअर (BIS CARE) हे मोबाईल ऍप्लिकेशन वापरून दागिन्यांचे तपशील तपासला जाऊ शकतो
मुंबई : भारतीय मानक ब्युरोने (BIS,बीआयएस ब्युरो) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा (BIS, Hallmark) गैरवापर रोखण्यासाठी दिनांक 20.01.2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष अंमलबजावणी (छापा आणि जप्ती) मोहीम राबवली.
यावेळी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
ठाणे, पुणे आणि नागपूर येथेही अशीच कारवाई करण्यात आली, त्यात बनावट चिन्हांकित दागिने जप्त करण्यात आले तसेच बीआयएसने निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता, सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणार्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
मेसर्स श्रीशंकेश्वर ॲसेइंग अँड टंच, झवेरी बाजार, मुंबई, मे. जय वैष्णव हॉलमार्किंग सेंटर, झवेरी बाजार, मुंबई, मे. विशाल हॉलमार्किंग सेंटर, जांभळी नाका, ठाणे,मेसर्स श्रीशंकेश्वर ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, अंधेरी, मुंबई, मे. जोगेश्वरी ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, रविवार पेठ, पुणे आणि मे. रिद्धी सिद्धी हॉलमार्क, इतवारी, नागपूर या ठिकाणी देखील छापा टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली.
16 जून 2021 पासून केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा ग्राहक व्यवहार विभाग, यांनी जारी केलेल्या सोन्याचे दागिने आणि सुवर्ण कलाकृती विक्री, 2020 च्या नुसार, सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींवर 16 जून 2021 पासून बिआयएस हॉलमार्किंग अनिवार्यपणे आहे.
बिआयएस हॉलमार्किंगचे सध्या 3 भाग आहेत – बिआयएस चिन्ह ( लोगो), कॅरेटची शुद्धता आणि सूक्ष्मता आणि 6 अंकी अल्फान्यूमेरिक “हॉलमार्किंग युनिक आयडेंटिटी नंबर(HUID)” जो प्रत्येक वस्तू/ कलाकृतीसाठी वेगळा आहे. दागिने फक्त बिआयएस (BIS) मध्ये नोंदणीकृत केलेल्या सराफांमार्फत विकले जाऊ शकतात आणि फक्त बिआयएस मान्यताप्राप्त ॲसेइंग आणि हॉलमार्किंग सेंटर (AHCs) द्वारे हॉलमार्क केले जाऊ शकतात.
बीआयएस कायदा 2016 नुसार, बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000,रुपये दंडाची शिक्षा आहे,परंतु हॉलमार्कसह किंवा बीआयएस कायदा 2016 नुसार स्टँडर्ड मार्कसह चिकटवलेल्या किंवा लागू केलेल्या वस्तूच्या मूल्याच्या दहापट पर्यंत सुध्दा ही रक्कम वाढविता येते. वर नमूद केलेल्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई सुरू केली जात आहे. अशा बेकायदेशीर बनावट मार्किंगमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अनेक वेळा असेही निदर्शनास आले आहे की, बनावट हॉलमार्क केलेले दागिने ग्राहकांना मोठ्या नफा घेऊन विकले जातात. म्हणून बिआयएस चिन्ह,( BIS logo) कॅरेटमधील शुद्धता आणि सूक्ष्मता आणि दागिन्यांवर क्रमांकासह (HUID) यासह संपूर्ण BIS हॉलमार्क कोरलेला तपासून घेणे महत्त्वाचे आहे.
हॉलमार्क युनिक आयडी, (HUID) प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावर कोरलेला एक विशिष्ट कोड असतो, जो त्यावर चिन्हांकित बिआय एस BIS हॉलमार्कला प्रमाणीत करतो.
बिआय एस केअर (BIS CARE) हे मोबाईल ऍप्लिकेशन वापरून दागिन्यांची शुद्धता, दागिन्यांचा प्रकार, जेथून दागिने हॉलमार्क केले आहेत आणि दागिन्यांची चाचणी प्रमाणित केली आहे, त्या हॉलमार्किंग केंद्रासह सराफाचे नाव इत्यादी हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचे तपशील देखील खरेदी करण्यापूर्वी, HUID क्रमांक टाकून तपासला जाऊ शकतो.
जर एखाद्या ग्राहकाला कोणत्याही दागिन्यांवर/वस्तूवर बिआयएस हॉलमार्कचा गैरवापर केल्याचे आढळल्यास, बिआयएस केअर मोबाईल ऍप्लिकेशन वापरून बिआयएसला त्याची माहिती दिली जाऊ शकते. बिआयएस अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com