Famous Singer Rahul Deshpande’s ‘Vithu Mauli Majhi’ Bhajan Pahaat program on the occasion of Kartiki Ekadashi
कार्तिकी एकादशी निमित्त प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा ‘विठू माऊली माझी’ हा भजन पहाट कार्यक्रम
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कार्तिकी एकादशी निमित्त प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा ‘विठू माऊली माझी’ हा भजन पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे यंदाचे 23 वे वर्ष असून हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 6:30 वाजता महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, वानवडी येथे आयोजित केला असल्याची माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले आहे.
सुप्रसिद्ध गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचे राहुल देशपांडे हे नातू असून वसंतराव देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘वसंतोत्सव’ या कार्यक्रमाचे ते आयोजन करीत आले आहेत.
पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा अभ्यास करताना राहुल यांना शास्त्रीय गायनात रुची निर्माण झाली. राहुल यांना पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे व डॉ. मधुसूदन पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले असून राहुल देशपांडे यांचे गायनाचे शिक्षण विदुषी उषाताई चिपलकट्टी आणि पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याकडे झाले.
ख्याल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, होरी, टप्पा, गझल, अभंग, भजन, नाट्य संगीत आणि भावगीत या गायन प्रकारात राहुल देशपांडे यांचे विशेष प्रभुत्व आहे. राहुल देशपांडे यांना संगीत क्षेत्रातील अनेक मान-सन्मान प्राप्त झाले आहेत नुकताच त्यांना संस्थेच्या वतीने राम कदम कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com