Financial Literacy Campaign for Students of Rashtriya Chhatra Sena by Bank of Maharashtra
बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांसाठी वित्तीय साक्षरता अभियान
पुणे : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी गणराज्य दिनाच्या संचलनासाठी निवड झालेल्या ३७० छात्रांसाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या पुणे येथील मुख्यालयात वित्तीय साक्षरता अभियानाची प्राथमिक माहिती करून देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार हे वित्तीय साक्षरता जागरण अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते व त्यांनी आपल्या भाषणात वित्तीय साक्षरतेचे महत्व विशद केले.
“ राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये तरुण छात्रांना निस्वार्थ सेवेसह उत्तम चारित्र्य व ठाम नेतृत्व करण्यासाठी तयार केले जाते. जलद गतीने विकसित होणाऱ्या आपल्या सारख्या देशात सर्वोत्तम कामगिरी करावयाची असेल तर कळत्या वयापासूनच वित्तीय साक्षरता असणे अत्यावश्यक आहे “ असे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार यांनी उद्घाटन कार्यक्रमास संबोधित करताना सांगितले.
भारत सरकारच्या पंतप्रधान जीवन बिमा योजना, पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, डिजिटल बँकिंग, सुकन्या समृद्धी योजना अशा महत्वाच्या योजनांची व त्यांच्या लाभांची माहिती राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार यांनी त्यानंतर उपरोक्त व विशेषतः अल्प बचत योजनांचे महत्व व फायदे – फायदे समजावून सांगितले व कळत्या वयापासूनच बँकिंग सुविधांचा विवेकाने कसा वापर करावा हे देखील नमूद केले.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व छात्रांना वित्तीय व्यवस्थापनाचे शिक्षण मिळावे या हेतूने सुरु केलेल्या “ वित्तीय साक्षरता अभियानाच्या अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वित्तीय नियोजन करून नियोजित व अचानक उद्भवणारे खर्च भागविण्यासाठी उद्दिष्टे निर्धारित करणे व डिजिटल बँकिंगचा उपयोग करून शासनाच्या विविध योजनांचा कसा लाभ घ्यावा तसेच विविध बचत व शैक्षणिक कर्जाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देणे हे वित्तीय साक्षरता अभियानाचे उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या संचालनालयाचे प्रभारी संचालक कर्नल के आर शेखर व बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य सुरक्षा अधिकारी कर्नल प्रमोद दहितुले यांचेसह राष्ट्रीय छात्र सेनेच्या संचालनालयाचे व बँक ऑफ महाराष्ट्रचे अन्य अधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी छात्रांना उपयोगी अशा बँकेच्या विविध योजनांची माहिती सादर केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com