‘पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचं’ उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते
कोल्हापूर : संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्यानं संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकानं आत्मसात करण्याची गरज आहे, असं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
आज कोल्हापूर इथं ‘पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचं’ उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी असून या संतांनी विश्व बंधुत्वाची शिकवण दिली आहे. आपण मात्र या शिकवणीपासून दूर जात आहोत अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली. सुखी जीवनासाठी संत साहित्याचं मनन – चिंतन करून ते विचार प्रत्येकानं आचरणात आणणं गरजेचं आहे, असं राज्यपाल म्हणाले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक, पदाधिकारी, वारकरी तसंच साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.