Food giver farmers should now be energy givers – Nitin Gadkari
अन्नदाता शेतकरी आता उर्जादाता व्हावा – नितिन गडकरी
पुणे (दौंड): शेतीमधून आता इंधन निर्मितीचे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत, त्यामुळे ऊसापासून साखर तयार करण्यापेक्षा इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा अशी अपेक्षा केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केली. इंधन निर्मितीमुळे अन्नदाता शेतकरी यापुढे उर्जादाता होईल व खर्या अर्थाने समृध्द होईल असेही यावेळी बोलतांना ते म्हणाले.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संस्थापक पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या बायो-गॅस प्रकल्पाचे उद्घाटन देखील गडकरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी श्री. पांडुरंग राऊत यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून पुढे आलेले पांडुरंग राऊत हे खर्या अर्थाने शेतकर्यांसाठी काम करीत आहेत. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाची योजना मांडली, त्यानुसार गोरगरीबांसाठी, शेतकरी वर्गासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. पांडुरंग राऊत जनसामान्यांसाठी अहोरात्र झटत आहेत, यासाठीच ते कौतुकास पात्र आहेत.
व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, दौडचे आमदार राहुल कुल, शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, हभप सुमंत हंबीर, हभप सुरेशमहाराजा साठे, रा.स्व.संघाचे नाना जाधव, सुहास हिरेमठ, जनसेवा बेँकेचे प्रदीप जगताप, डॉ. राजेंद्र हिरेमठ, बी.बी. ठोंबरे, प्रदीप कंद, राजपथचे जगदीश कदम, प्राज इंडस्ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी तसेच कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर, उपाध्यक्ष बबनराव गायकवाड, माधव राऊत आदी संचालक सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गडकरी पुढे म्हणाले की, देशामध्ये साखर उत्पादन गरजेपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉलचे उत्पादन वाढवावे तसेच वीज निर्मिती, बायो-गॅसची निर्मिती करावी. यापुढे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी कमी होत जाणार असून अशा पर्यायी इंधनाचा वापर वाढत चालला आहे.
ग्रीन हायड्रोजन हे देशाच्या उर्जेची गरज पूर्ण करणारे इंधन असून याची निर्मिती शेतातूनच होणार आहे. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने काळाची गरज ओळखून हे काम आधीच सुरु केले आहे, ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण विकास वाढवला पाहिजे, कृषी विकास 11 वरुन 20 टक्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतकरी सुखी, समृध्द होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील वाढेल, हीच आर्थिक राष्ट्रवादाची कल्पना आहे.
सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन पांडुंरग राऊत यांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने मोठे यश संपादन केले असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी नाना जाधन, विकास रासकर, हरिभाऊ बागडे, विनोद तावडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी आभार मानले तर भालचंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
हडपसर न्युज ब्युरो