For students from ordinary families, attached pages of booklets along with the textbook are essential-Deepak Kesarkar
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची जोडलेली पाने आवश्यक-दीपक केसरकर
पुणे : सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने टाकण्याबाबत बालभारती येथे विषय तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
श्री.केसरकर म्हणाले, शिक्षकांनी पुस्तकातील विषयावर दिलेली टिपणे विद्यार्थ्याने या पानांवर लिहावे अशी अपेक्षा आहे. त्यावरून शिक्षकांनी वर्गात घेतलेला अभ्यासही लक्षात येईल. गरीबतल्या गरीब मुलालाही वह्यांची पाने असलेली पुस्तके उपयुक्त ठरली पाहिजेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल आणि पालक-शिक्षकांकडून येणाऱ्या सूचनांच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी किती पानांचा लिखाणासाठी उपयोग करतात याचाही अभ्यास करण्यात यावा. यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची एक समिती नेमण्यात येणार असून समिती सदस्य या उपक्रमाबाबत शिक्षकांना माहिती देण्यासोबत अभ्यासही करेल.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्याचे व्यक्तिमत्व घडविणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना अनुभवाने त्यात बदलही करता येईल. शालेय शिक्षणाची गुणवत्ता उत्तम राहावी यासाठी आवश्यक उपक्रम राबविताना मुलांवर अभ्यासाचा बोजा पडणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
शालेय स्तरावर तीन महिन्यांनी परीक्षा घेण्याचा विचार व्हावा. तिमाहीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देऊन त्यांना सहामाही परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्यादृष्टीने तयारी करून घेता येईल. सहावीपासून राज्यात एकाचवेळी कलचाचणी घेण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आवडीनुसार व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविता येईल. मुलांना पोषण आहारातून अधिक पौष्टिक तत्व मिळावे यदृष्टीनेही अनुकूल बदल करावे लागतील, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com