Former MLA of Shivaji Nagar, Pune, Vinayak Nimhan passed away
पुण्यातल्या शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
पुणे : पुण्यातल्या शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. पुण्याच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सामान्य कार्यकर्ता ते आमदार
निम्हण यानी शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात करून आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आमदारकी पर्यंत पोहोचले होते.
निम्हण हे १९९९ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विनायक निम्हण यांनी दोन वेळा शिवसेनेकडून आणि २००९ मध्ये काँग्रेस आमदार म्हणून काम केलं.
माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर ते तिसऱ्या वेळेस काँग्रेसच्या तिकीटावर शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून येत आमदार झाले होते.
२०१४मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश
२०१४ मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. निम्हण यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com