Foundation stone laying ceremony of Super Specialty Veterinary Hospital in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखान्याचा पायाभरणी कार्यक्रम
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, औंध येथील सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखाना पायाभरणी कार्यक्रमाचे शनिवार 9 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा नियोजन समितीने सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाकरिता 4 कोटी 78 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. पुणे महानगरपालिका 3 कोटी रुपये तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देणार आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लहान व मोठ्या पशुधन यांच्यामधील गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपकरणे तसेच रोगनिदानासाठीचे अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिचंवड शहर तसेच जिल्ह्यातील व जवळच्या जिल्ह्यातील पशुधनाला आणि पयार्याने पशुपालक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
आवश्यकतेनुसार आणि अत्यवस्थ पशुधनाला अंतररुग्ण उपचाराची सुविधा, पशुपालकाला तज्ज्ञ मार्गदर्शनाची सुविधा, पशुसंवर्धन क्षेत्रीय तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुंतागुंतीच्या व अवघड शस्त्रक्रियांचे प्रत्यक्ष तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणे, पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी समन्वयाने मार्गदर्शन व प्रशिक्षण या विविध बाबीवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे कार्य करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन विभागाअंतर्गत औंध येथे उभारण्यात येणारा सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखाना हे राज्यातील एकमेव दवाखाना असल्यामुळे या दवाखान्याचा सर्वसामान्य, गोरगरीब आणि गरजू पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी अत्यंत वाजवी दरामध्ये अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
प्राण्यांपासून मानवास होणाऱ्या आजारांचे (झुनोटिक रोग) वाढते प्रमाण लक्षात घेता, हे आजार टाळणे व त्यांचे वेळीच निदान व उपचार करण्याबरोबरच पशुपालकांना आवश्यक सविस्तर मार्गदर्शन करणे ही आज काळाची गरज असून ती जबाबदारी या संस्थेद्वारे पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी दिली आहे.
Hadapsar News Bureau.