Anurag Singh Thakur inaugurated the fourth Y20 consultation meeting in Pune
अनुराग सिंह ठाकूर यांनी पुणे इथे चौथ्या Y20 सल्लामसलत बैठकीचे केले उद्घाटन
आपला देश अमृत काळाकडून स्वर्णिम काळाच्या दिशेने प्रवास करत आहे. आपल्या या प्रवासात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार आहे असा केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा विश्वास
पुणे: भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहयोगाने आज पुणे इथल्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (SIU), मध्ये चौथी Y20 सल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंह ठाकूर, उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष, डॉ.संदीप वासलेकर यांनी कार्यक्रमात बीजभाषण दिले.
सिम्बायोसिस चे संस्थापक आणि अध्यक्ष, आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलपति प्रा. (डॉ.) एस. बी. मुजुमदार, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे संचालक पंकज सिंह, Y20 इंडियाचे अध्यक्ष अनमोल सोवित, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या उप कुलगुरू रजनी गुप्ते हे देखील यावेळी उपस्थित होते.
देशाच्या युवा वर्गाचा वर्तमान काळात सर्वात मोठा वाटा असतो असं केंद्रीय युवा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित Y२० परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
“मला पुण्यात आल्याचा आनंद होत आहे, जे भरभराटीला आलेले उत्पादन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि एक अग्रगण्य शैक्षणिक केंद्र आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 10 पेक्षा जास्त विद्यापीठे आणि 100 संस्थांसह, हे शहर अनेक पिढ्यांसाठी ज्ञान आणि संस्कृतीचा दीपस्तंभ ठरले असून, ते जगभरातील विद्यार्थी आणि प्रज्ञावंतांना आकर्षित करत आहे. सिम्बायोसिस सारख्या संस्था जगभरातील हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. Y20 कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यापेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही. अशा संस्था बदलाची बीजे पेरतात आणि जोपासतात.”
अनुराग ठाकूर
युवकांच्या मनातला आवाज ऐकता यावा याकरता ही परिषद आयोजित करण्यात आली आहे, असं ते म्हणाले. समाजासमोरच्या आव्हनांना तोंड देण्यासाठी त्यांचं आकलन युवा वर्गाच्या नजरेतून करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. भारतात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. २०१४ नंतर भारताने विविध क्षेत्रात केलेली कामगिरी स्तंभित करणारी असून बहुतांश क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशात आपला क्रमांक लागतो.
अनेक देशात युद्धजन्य स्थिती असून यामध्ये राजनैतिक तोडगा, चर्चा आणि संवाद या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार यामुळे जगाच्या क्षितिजावर भारताचे अस्तित्व अधोरेखित झाले असल्याचे केंद्रीय युवा, क्रीडा आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पुण्यात सांगितलं.
युवा वर्ग हे विश्वाचे भवितव्य असून त्यांनी वसुधैव कुटुंबकम वसा घ्यायला हवा.अशी अपेक्षा स्ट्राटेजिक फोरसाईट समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप वासलेकर यांनी आपल्या बीजभाषणात व्यक्त केली.
विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर शां. ब. मुजुमदार यांनी वसुधैव कुटुंबकम साठी विचार विनिमय बैठक महत्वाची असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. शांतता निर्माण आणि सलोखा, युद्ध विरहित युगाची सुरुवात, वसुधैव कुटुंबकम ही या बैठकीची संकल्पना आहे. या बैठकीसाठी आफ्रिका, दक्षिण आशिया मधील दुर्गम देशातले विद्यार्थी उपस्थित आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com