Free modular feet, prosthetic arms and callipers for people with disabilities
भारत विकास परिषदेतर्फे 60 गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत मोड्युलर फूट, कृत्रिम हात आणि कॅलिपर्स
पुणे : भारत विकास परिषदेतर्फे रविवार, दि. 19 जून 2022 रोजी पुण्यातील विकलांग पुनर्वसन केंद्रामध्ये 60 गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत मोड्युलर फूट, कृत्रिम हात आणि कॅलिपर्स बसविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते गरजू अपंगांना कृत्रिम पाय देण्यात आले. मोफत कृत्रिम पाय शिबिर रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आणि वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने संपन्न झाले.
रोटरी क्लबचे श्री.माधव तिळगुळकर, सौ.सुभेदार आणि वात्सल्य ट्रस्टचे श्री. गिरिश कुलकर्णी यांचा सक्रिय सहभाग होता. रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर श्री. शितल शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
भारत विकास परिषदेचे श्री.दत्ता चितळे यांनी सर्व दिव्यांग व्यक्तींना मॉड्युलर फूट बसविल्यानंतर त्याचा यशस्वीपणे वापर करावा आणि स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहून समाजातील इतर वंचित अपंगांना प्रोत्साहन देऊन, मार्गदर्शन करून त्यांचेही जीवन पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होईल यासाठी काहीना काही योगदान द्यावे असे आवाहन केले.
परिषदेच्या पुण्यातील केंद्राची सुरुवात 1997 साली एका अपंग तरुणाला जयपूर फूट (कृत्रिम पाय) तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन झाली होती. तीच अपंग व्यक्ती या केंद्रामध्ये 20 वर्षे प्रमुख कारागीर म्हणून काम करत होती. आता या कारागिराने स्वत:चे वर्कशॉप सुरू केले आहे.
शितल शहा यांनी परिषदेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून यापुढेही रोटरी क्लबचे पाठबळ सतत मिळत राहीत असे आश्वासन दिले.
वात्सल्य ट्रस्ट तर्फे या शिबिरामध्ये सेरेबल पाल्सी (गतिमंद) मुलांना विशिष्ट प्रकारची पॅडस दिली. अशा मुलांचा विकास व प्रगती करण्यासाठी मुंबईहून फिजिओ थेरपिस्ट येतील आणि या पुढील प्रत्येक शिबिरामध्ये सेरेबल पाल्सी पिडीत मुलांवर सुद्धा उपचार केले जातील असे आश्वासन दिले.
परिषदेचे विकलांग केंद्र प्रमुख श्री. विनय खटावकर यांनी सर्व लाभार्थींना कृत्रिम पाय वापरण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले. भारत विकास परिषदेचे ट्रस्टी श्री. राजेंद्र जोग यांनी मुख्यय आरोग्यय प्रमुख श्री. भारती यांना विकलांग केंद्राची सविस्तर माहिती दिली.
सदर केंद्र महानगरपालिकेच्या एरंडवणे येथील थरकुडे दवाखानाच्या आवारात कार्यरत आहे. या केंद्रासाठी जास्त सोयी सुविधा व वाढीव जागा आणि शक्य ती सर्व मदत महानगरपालिके तर्फे दिली जाईल असे आश्वासन डॉ. भारती यांनी दिले.
ससुन हॉस्पिटलचे डॉ.शंकर मुगावे हे सुद्धा या कार्यकमामध्ये उपस्थित होते. विकलांग केंद्राचे व्यवस्थापक श्री. जयंत जेस्ते आणि कार्यालय प्रमुख श्री.अनिरुद्ध पाटणकर यांनी शिबिराचे नियोजन केले.
लाभार्थींपैकी एका व्यक्तीने कृत्रिम पाय बसवल्यानंतर सहजपणे सायकल चालवून दाखवली. एकाने खांद्यावर लहान मुलाला उचलून घेऊन सहजपणे चालून दाखवले. एकाने जिन्याच्या पायर्या चढून उंचीवरून उडी मारून दाखवले. काही लाभार्थींनी स्वत:च्या प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा प्रकारे मोफत मोड्यक्र फूट, कॅलिपर्स व कृत्रिम हात इतरत्र कोठेही विनामुल्य मिळत नाहीत. त्यामुळे या केंद्राचा आमच्यासारख्या गरीब व गरजू अपंगांना खूप मोठा आधार आहे आणि कृत्रिम पाय बसवल्यामुळे नवजीवन प्राप्त होऊन पुन्हा एकदा आमचे आयुष्य व्यवस्थित मार्गी लागले आहे अशा भावना व्यक्त केल्या.
भारत विकास परिषदेतर्फे विनामुल्य दिल्या जात असलेल्या मॉड्यूलर फूटची किंमत बाजारामध्ये रु.40 हजार इतकी असते. परिषदेतर्फे हे केंद्र गेली 25 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे. आजपयरत येथे सुमारे 20 हजार व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर्स दिले गेले आहेत.
भविष्यामध्ये या कामाची व्याप्ती वाढवून संपूर्ण पुणे शहर विकलांगता मुक्त करण्याचा मानस सर्व विश्वस्तांनी व्यक्त केला. सध्या दरमहा किमान एक शिबिर आयोजित केले जाते आणि प्रत्येक शिबिरात अंदाजे 100 लाभार्थींना मोफत कृत्रिम पाय दिले जातात.
भारत विकास परिषदेची संपूर्ण भारतभर अश्या प्रकारची 14 ठिकाणी केंद्रे आहेत. यापूर्वी लुधियाना येथील केंद्राला दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला होता आणि तेथे संपूर्ण शहर विकलांगता मुक्त करण्यात आले होते. विविध कारणांमुळे (मधुमेह, अपघात वगैरे) दरवर्षी भारतात निर्माण होणार्या एकूण अपंगांच्या संख्येेपैकी अंदाजे 70% अपंगांना परिषदेतर्फे मोफत पाय बसविले जातात.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com