‘Gaiye Ganapati’ program organized by Fine Arts Center of the University
विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे ‘गाईये गणपती’ कार्यक्रम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र विभागाने गणेशोत्सवानिमित्त ‘गाईये गणपती’ ह्या विशेष कार्यक्रमाची निर्मिती केली असून दि. २ व दि. ३ सप्टेंबर २०२२ रोजी त्याची प्रस्तुती होणार आहे.
श्रीगणेश विषयक एकवीस रचनांच्या ह्या मैफलीत श्रीगणेशाचे रूपवर्णन व महिमा असलेल्या संत तुलसीदास, अमृतराय, पठ्ठे बापूराव आदी कवींच्या काव्यरचनांचा समावेश आहे. विविध रचनाकारांच्या खयाल, धमार, तराना, चतुरंग यांसह गण, कटाव, इ. प्रकारच्या रचना यात सादर होतील. संकल्पना व संगीत मार्गदर्शन प्रा. हेमा देशपांडे यांचे असून संगीत विषयाच्या बी.ए. व एम.ए. वर्षातील विद्यार्थी प्रस्तुती करतील.
‘गाईये गणपती’चा पहिला प्रयोग शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी स. ११ ते १ या वेळेत विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात होणार असून ‘स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनिमित्त ललित कला केंद्राचे ७५ कार्यक्रम’ ह्या मालिकेतील हा दुसरा कार्यक्रम आहे.
‘गाईये गणपती’चा दुसरा प्रयोग शनिवार दि. ३ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ६ वा. गांधर्व महाविद्यालय येथे होणार आहे. सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश व सस्नेह निमंत्रण असल्याची माहिती ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com