Senior leader MP Gajanan Kirtikar joins Balasaheb’s Shiv Sena party
ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांचा, बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
बाळासाहेब गेले अन् मला डावललं… -गजानन कीर्तिकर
उद्यापासून लोकं त्यांना विसरून जातील – संजय राऊत
मुंबई : ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. कीर्तिकर यांच्या प्रवेशाने पक्षाला नवं बळ मिळालं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण पक्षप्रवेश करत असल्याची भावना यावेळी कीर्तिकर यांनी व्यक्त केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आपल्याला पक्षात सतत डावलले गेल्याची खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखविली.
यापुढे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बांधणीसाठी, पक्ष शिस्तीसाठी आणि पदाधिकारी कार्यकर्ते घडविण्यासाठी आपण कार्यालयीन कामकाजात अग्रेसर राहणार असल्याचेही किर्तीकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कीर्तिकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी याबाबतचं पत्रक जारी केलं आहे.
गजानन कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिलं नाही? पाचवेळा आमदार राहिले. दोन्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिले. दोनवेळा खासदार राहिले, असं सांगत संजय राऊत यांनी कीर्तिकर यांना दिलेल्या पदांची यादीच बाहेर काढली.
तसेच, अमोल हे कट्टर शिवसैनिक आहेत, उम्र की पडाव की बात है, आणखी काही नाही, अमोलने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकले नाहीत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते. फार फार मोठी सळसळ झाली असं काही नाही. गेले ठिक आहे. उद्यापासून लोकं त्यांना विसरून जातील, असं राऊत म्हणाले. आपण गेलात. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं. कीर्तिकर गेल्याने पक्षाला काहीच धक्का बसलेला नाही, पुन्हा निवडून यायचं आहे ना त्यांना, किती येतात ते पाहू, असं आव्हानही त्यांनी दिलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com