बेरोजगारांना सुवर्णसंधी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

Commissionerate of Skill Development

Golden opportunity for unemployed ‘Placement Drive’ on the second Wednesday of every month

बेरोजगारांना सुवर्णसंधी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पुण्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

पुणे : नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने यापुढे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पहिला प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या ११ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.Commissionerate of Skill Development

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याप्रसंगी विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरिता पाचारण करण्यात येणार आहे. या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहून पात्र होतील अशा उमेदवारांना लगेच जागेवरच नोकरीची संधी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नांवनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘1स्ट प्लेसमेंट ड्राइव्ह- पुणे’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार ११ जानेवारी रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-११ येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *