Gram Sevak Training Institute Foundation Course approved by Tata Institute of Social Sciences
ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था पायाभूत अभ्यासक्रमाला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची मान्यता
पुणे : मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या शैक्षणिक परिषदेने मांजरी फार्म पुणे येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेतील ग्रामसेवकांसाठी पायाभूत अभ्यासक्रमाला संस्थेचा अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेत शिकवला जाईल.
प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकांच्या शैक्षणिक आणि मूल्यमापनासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापक असतील. या दोन्ही संस्था संशोधन आणि दोन्ही संस्थांच्या परिसरातील सुविधांच्या वापरासाठी सहकार्य करतील. एक आठवड्यापूर्वी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सहकार्यास मान्यता दिली होती.
मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था ही राज्यातील ग्रामीण विकास व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अकरा संस्थांपैकी एक असून संस्थेंतर्गत पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांचे प्रशिक्षण घेण्यात येते.
ग्रामसेवक प्रशिक्षणाच्यादृष्टीने हा महत्वाचा दिवस आहे. उत्तम प्रशिक्षणासह, अद्ययावत अभ्यासक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा होईल. या यशाबद्दल मी ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या मान्यतेबद्दल आणि मार्गदर्शनासाठी आभार. यशदा आणि टीसच्या अधिकाऱ्यांनाही बहुमूल्य सहकार्याबद्दल धन्यवाद.
आयुष प्रसाद- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे
भारत सरकारने ५ कोटी २९ लक्ष खर्चाच्या इमारत संकुलाला मंजुरी दिली असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी सेवांतर्गत आणि पायाभूत अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी शासनाने या संस्थेला पुणे जिल्हा प्रशिक्षण संस्था घोषित केली आहे. संस्थेने गेल्या वर्षी विक्रमी २८ हजार व्यक्तींना पूर्णवेळ आणि अल्पकालीन अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले आहे.
सहयोगाचे फायदे
टाटा सामाजिक विज्ञान संस्था संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. ‘टीस’च्या व्यावसायिक आणि पूर्णवेळ प्राध्यापकांच्या मदतीने अभ्यासक्रमाची शैक्षणिक कठोरता सुधारण्यास आणि प्रशिक्षणार्थींचे योग्य मूल्यमापन सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. यामुळे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि गावपातळीवर ग्रामीण विकासाला मदत होईल. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेच्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत असणाऱ्या सहकार्याचा आणि त्यांनी ग्रामीण विकासासंदर्भात केलेले संशोधन आणि विकसीत केलेल्या अध्यापन पद्धतीचा ग्रामसेवक प्रशिक्षणार्थी आणि इतर अधिकाऱ्यांना लाभ होणार आहे.
शैक्षणिक सहकार्य हे ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राध्यापकांनी केलेल्या दोन वर्षांच्या प्रयत्नांचे फलित आहे. त्यांनी अद्ययावत अभ्यासक्रमाचा मसुदा तयार केला, त्याचा विस्तृतपणे अभ्यास केला गेला, आणि यशदा अंतर्गत राज्य ग्रामीण विकास संस्थेने त्याची शिफारस केली. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाने शिफारसी स्वीकारून शासन निर्णय निर्गमित केला आहे. १९९४ नंतर अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या वरिष्ठ आणि तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने अभ्यासक्रमावर आधारीत शिकवण्याच्या वैज्ञानिक पद्धती विकसित केल्या गेल्या. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com