Both Houses of Parliament adjourned following ruckus over Adani Group issue
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प
अदानी उद्योगसमूह घोटाळा प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी
नवी दिल्ली : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, जनता दल संयुक्त, शिवसेना ठाकरे गट, इत्यादी पक्षांच्या सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नियुक्त करण्याची मागणी ते करत होते.
गोंधळादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आंदोलक सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना केलेल्या अभिभाषणावर सभागृहाला चर्चा करण्यास परवानगी द्यावी असे आवाहन केले. ते म्हणाले, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा ही संसदीय परंपरा असून ती रखडता कामा नये. जोशी पुढे म्हणाले की, सदस्य चर्चेदरम्यान कोणताही मुद्दा उपस्थित करू शकतात आणि सरकार उत्तर देण्यास तयार आहे. मंत्री म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मुद्द्यावर सरकारची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. पीठासीन अधिकाऱ्यांनी सदस्यांना त्यांच्या जागेवर परत जाण्याचे आवाहन केले मात्र आंदोलक सदस्यांनी आपला विरोध सुरूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
सकाळी सभागृहाची बैठक सुरू असताना विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून गदारोळ केला. सभापती ओम बिर्ला म्हणाले की, सभागृह वादविवाद आणि चर्चेसाठी आहे आणि पूर्वनियोजित पद्धतीने कामकाज थांबवणे योग्य नाही. श्री बिर्ला म्हणाले की, ते प्रत्येक सदस्याचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार आहेत, परंतु ज्या प्रकारे सभागृहात व्यत्यय आणला जात आहे तो शिष्टाचाराच्या विरोधात आहे. सभागृहात घोषणाबाजी करणे हे देशातील लोकांच्या हिताच्या विरोधात आहे, असे सांगून त्यांनी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, असे सदस्यांना वारंवार सांगितले. मात्र आंदोलक सदस्यांनी लक्ष न दिल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
राज्यसभेत या प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, डावे पक्ष, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत प्रचंड गदारोळ केला. सदस्यांचं वर्तन देशवासियांच्या सभागृहाकडून असलेल्या अपेक्षांना हरताळ फासणारं असल्याचं उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही कामकाज सुरु झाल्यावर गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
या आणि इतर मागण्यांसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राजद, आप इत्यादी पक्षांचे अदानी उद्योगसमूह घोटाळा प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी खासदार त्यात सहभागी झाले होते. याप्रकरणी विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर इतर कामकाजाआधी चर्चा व्हावी अशी आपली मागणी असल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रसारमाध्यमंना सांगितलं.
या चर्चेनंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारप्रस्तावावर चर्चा करायला विरोधक तयार आहेत असं ते म्हणाले. यापूर्वी आज सकाळी अदानी हिंडेनबर्ग मुद्द्यावर धोरण ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक खर्गे यांच्या कार्यालयात झाली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com