The annual growth rate of startups in the country is still higher than in the US, UK and many other countries – PM
कोरोना काळातही देशातल्या स्टार्टअपचा वार्षिक वृद्धी दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा मोठा आहे – प्रधानमंत्री
नवी दिल्ली : जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळातही देशातल्या स्टार्टअपनी संपत्ती आणि मूल्य निर्मिती सुरू ठेवली. देशातल्या स्टार्टअपचा वार्षिक वृद्धी दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा मोठा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आज त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. येत्या काही वर्षात देशातल्या युनिकॉर्नची संख्या आणखी वाढेल, असंही ते म्हणाले.
गेल्या महिन्याच्या ५ तारखेला देशातल्या युनिकॉर्नची संख्या १०० वर पोहोचली. म्हणजेच १०० स्टार्ट अपचं मूल्य साडे ७ हजार कोटींपेक्षा अधिक झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी आज दिली. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, असं ते म्हणाले. यातले ४४ युनिकॉर्न गेल्यावर्षी तर १४ यावर्षी तयार झाले आहेत.
आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत. ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्ट-अप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे.
आज, भारताची स्टार्ट-अप यंत्रणाकेवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येते.
देशातली युवाशक्ती, प्रतिभा आणि देशातलं सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य झालं आहे. देशात उपलब्ध असलेल्या योग्य मार्गदर्शकांमुळं स्टार्टअपला हे यश मिळवला आलं, असंही प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी अशाच काही मार्गदर्शकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
येत्या २१ जून रोजी ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात ७५ ठिकाणी मोठ्या स्वरुपात कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. कोरोनाविषयक सर्व काळजी घेऊन यात सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केलं.
मित्रांनो, यावेळी देश-विदेशात ‘योग दिना’निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या काही अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मला माहिती मिळाली आहे. यापैकी एक म्हणजे ‘ संरक्षक वलय‘.guardian ring. हा एक अतिशय अनोखा कार्यक्रम असेल. यामध्ये सूर्याचे भ्रमण साजरे केले जाईल, म्हणजेच सूर्य पृथ्वीच्या विविध भागातून जसे जसे भ्रमण करत जाईल, तिथे तिथे आपण योगाद्वारे त्याचे स्वागत करू.
विविध देशांतील भारतीय संस्था तेथील स्थानिक वेळेनुसार सूर्योदयाच्या वेळी योगाचे कार्यक्रम आयोजित करतील. एका पाठोपाठ एक असे विविध देशातून कार्यक्रम सुरू होतील. पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा निरंतर प्रवास चालेल, मग तसेच कार्यक्रम देखील पुढे जात राहतील. या कार्यक्रमांचे प्रक्षेपण देखील एकामागोमाग एक जोडले जाईल, म्हणजेच हा एक प्रकारचा ‘योग प्रक्षेपण साखळी कार्यक्रमच ‘ असेल. तुम्ही पण हा कार्यक्रम अवश्य पहा.
श्रीधर वेंबुजी यांना नुकताच पद्म पुरस्कार मिळाला आहे. ते स्वत: एक यशस्वी उद्योजक आहेत, पण आता त्यांनी आणखी काही उद्योजकांना घडविण्याचे कामही हाती घेतले आहे. श्रीधरजींनी आपल्या कामाची सुरुवात ग्रामीण भागातून केली आहे. गावातच राहून ग्रामीण तरुणांना या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत.
आपल्याकडे मदन पडाकी यांच्यासारखेही लोक आहेत, ज्यांनी ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2014 साली वन-ब्रिज नावाचा मंच तयार केला.
यावेळी त्यांनी तंजावर मधल्या महिला बचत गटाने पाठवलेल्या खास बाहुलीचा उल्लेख केला. G I टॅग मिळालेली ही बाहुली तसंच या बचत गटांनी त्यांच्या वस्तुंच्या विक्रीसाठी सुरू केलेल्या दुकांनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. या सर्व दुकानांमधला कारभार महिलाच चालवतात आणि यामुळं त्यांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं.
‘मन की बात’च्या श्रोत्यांनाही माझी एक विनंती आहे. तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा. असे केल्यानेतुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभारलावणार नाही तर त्यायोगे’आत्मनिर्भर भारत मोहिमेला’ चालनाही मिळेल.
देशात भाषा, लिपी आणि बोलींचा समृद्ध खजिना आहे. कठीण परिस्थितीत नवनवीन भाषा शिकणाऱ्या एका दिव्यांग विद्यार्थिनी माहिती प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात मधून दिली. तसंच संथाली समाजासाठी ‘ओल चिकी’ लिपीमध्ये संविधानाची प्रत तयार करणाऱ्या श्रीपती तुडू जी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे हे यथार्थ उदाहरण आहे. या भावनेला पुढे नेणाऱ्या अशा अनेक प्रयत्नांची माहिती तुम्हाला ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या संकेतस्थळावर मिळेल. तिथे तुम्हाला खाद्य, कला, संस्कृती, पर्यटन अशा अनेक विषयांवरील उपक्रमांची माहिती मिळेल. तुम्हीही या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता, यामुळे तुम्हाला आपल्या देशाबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या देशातील विविधतेचीही जाणीव होईल.
जपानच्या दौऱ्यादरम्यान भेटलेल्या हिरोशी कोइके या दिग्दर्शकाच्या कामगिरीची माहिती प्रधानमंत्र्यांनी आज दिली. आशिया खंडातल्या विविध देशात जाऊन तिथल्या स्थानिक कलाकारांच्या मदतीनं ते महाभारतातले काही भाग तयार करत आहे. गेल्या ९ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. जपानमधलेच आत्सुशी मात्सुओ-जी आणि केंजी योशी-जी हे रामायणावर आधारित अॅनिमेशन पट तयार करत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
देशातल्या धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता ठेवण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात मधून केलं. तीर्थक्षेत्रांची शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण जपण्यासाठी स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
आता आपल्या देशात ‘चारधाम यात्रेबरोबरचआगामीकाळात ‘अमरनाथ यात्रा’, ‘पंढरपूर यात्रा’, ‘जगन्नाथ यात्रा’ अशा अनेक यात्रा होणार आहेत. श्रावण महिन्यात तर प्रत्येक गावात हमखास जत्रा असतेच. मित्रहो,आपल्याकडे तीर्थयात्रा महत्वाची आहे, त्याचप्रमाणे तीर्थ सेवेचेही महत्त्व सांगितले आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थ सेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण आहे.
यावेळी त्यांनी विविध धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्नरत असलेल्या विविध व्यक्तींच्या प्रयत्नांचा उल्लेख केला.
हडपसर न्युज ब्युरो