Happy Ganeshotsav from Chief Minister Eknath Shinde
विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो याशब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया,’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी.
आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केला असून त्याच्यापूर्तीसाठी आपल्या मनातलं आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्याच्या विकासाचं मनोरथ पूर्णत्वास जाण्यासाठी आपली साथही हवी आहे. कोरोना संकटामुळं मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com