To celebrate the “Har Ghar Tiranga” campaign, Bank of Maharashtra organized a two-wheeler procession with the tricolor flag
“ हर घर तिरंगा “ अभियान साजरा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे तिरंगा ध्वजासह दुचाकी मिरवणुकीचे आयोजन
पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून व “ हर घर तिरंगा “ अभियानाचा संदेश प्रसार करण्यासाठी बँक ऑफ महाराष्टच्या पुणे विभागीय कार्यालयाने तिरंगा ध्वजासह दुचाकी मिरवणुकीचे आयोजन केले होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजयकुमार यांनी विभागीय कार्यालयाच्या फर्ग्युसन रोडवरील यशोमंगल इमारतीपासून निघालेल्या दुचाकी मिरवणुकीचे नेतृत्व केले.
पुणे शहरातील १० किलोमीटर अंतराच्या या मिरवणुकीमध्ये बँकेचे मुख्य कार्यालय लोकमंगल, शिवाजी नगर, शनिवारवाडा व केसरी वाडा या ठिकाणांचा समावेश होता. पुणे शहर विभागीय कार्यालयाचे विभाग प्रमुख व सरव्यवस्थापक श्री राजेश सिंग, उप विभागीय प्रबंधक श्री प्रसांत दाश, गृह वित्त शाखा, निगमिय वित्त शाखा, विदेश व्यापार शाखा, धनादेश प्रक्रिया केंद्र यांचे शाखा प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. श्री. अमित श्रीवास्तव मुख्य दक्षता अधिकारी, बँकेचे सर्व सरव्यवस्थापक , उपसरव्यवस्थापक व अन्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात एकत्रित होऊन तिरंगा दुचाकी मिरवणुकीचे स्वागत केले व “ हर घर तिरंगा “ अशा घोषणा सुद्धा दिल्या
कार्यक्रमाच्या सुरवातीलाच बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन दुचाकी मिरवणूक काढून “ हर घर तिरंगा “ अभियानाचा आणि देशभक्ति जागरूकता संदेश देण्याची ही कल्पना पुणेकरांना अतिशय भावल्याचे सांगितले. स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाचा हा अभिमानास्पद क्षण साजरा करताना आम्ही बँकांमध्ये काम करणारे लोक सुद्धा राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्वाची भूमिका निभावत आहोत असेही प्रतिपादन श्री ए बी विजयकुमार यांनी केले.
आमच्या सन्माननीय ग्राहक व हितसंबंधीयांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कोणत्याही परिस्थितीत तडा जाऊ देणार नाही आणि नागरिकांमध्ये सर्व प्रकारची जागरूकता निर्माण करणे व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे श्री विजयकुमार यांनी सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे विभागिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिरंगा ध्वज व वित्तीय साक्षरता, डिजिटल भारत , भ्रष्टाचारमुक्त भारत यावरील घोषणांचे संदेश असलेले फलक हाती घेऊन मिरवणुकीत भाग घेतला. त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त नृत्य केले व सजग बँकिंग बद्दल व “ हर घर तिरंगा “ मोहीमचा प्रसार करण्यासाठी उपस्थित जनतेला माहिती दिली
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरातील सर्व राज्यांमध्ये असलेल्या विभागीय कार्यालये व शाखांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com